Maharashtra Politics : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे अचानकपणे दिल्ली दौऱ्यावर गेले असताना दुसरीकडे आणखी एक उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकारी अध्यक्ष सुप्रिया सुळे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. ट्रिपल इंजिन सरकारमधील एका नाराज इंजिनने देवेंद्र फडणवीस यांना भेटले असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. त्यामुळे अजित पवार हे नाराज असल्याची चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका मेळाव्याला संबोधित करताना सुप्रिया सुळे यांनी सूचक वक्तव्य केले आहे. सुप्रिया सुळे यांनी म्हटले की, मागील तीन महिन्यापूर्वी राज्यात ट्रिपल इंजिनचे सरकार स्थापन झाले होते. त्यानंतर आता या तीन महिन्यात सरकारमध्ये नाराजी सुरू झाली आहे. ट्रिपल इंजिनमधील एक नाराज घटक देवेंद्र फडणवीसांना भेटले असल्याचे सुप्रिया सुळे यांनी म्हटले. हे सरकार नेमकं कोण चालवतोय असा सवाल सुप्रिया सुळे यांनी केला.
अजित पवार नाराज?
शरद पवार यांची साथ सोडत अजित पवार यांनी भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अजित पवारांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मात्र, अजित पवार हे मागील काही दिवसांपासून नाराज असल्याची चर्चा सुरू आहे. आज, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला देखील अजित पवार यांनी दांडी मारली. त्यामुळे त्याच्या नाराजीची अधिकच चर्चा सुरू झाली आहे.
राज्याचा रखडलेला मंत्रिमंडळाचा विस्तार आणि पालकमंत्रीपदाचा अद्याप न सुटलेला पेच यावरून राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिंदे-फडणवीसांवर मोठा दबाव असल्याची चर्चा आहे
मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री अचानक दिल्ली दौऱ्यावर
राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) हे दिल्लीच्या दौऱ्यावर गेले आहेत. हे दोन्ही नेते अचानक दिल्लीला गेले असल्यामुळे राजकीय तर्कवितर्क लढवले जात आहेत. शिंदे आणि फडणवीस आज भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा (JP Nadda) आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shaha) यांची भेट घेणार असल्याची माहिती आहे.
असं असलं तरी अजित पवारांची (Ajit Pawar) नाराजी आणि राष्ट्रवादीकडून वाढता दबाव हे या दिल्ली दौऱ्यामागचं कारण आहे का असाही प्रश्न राजकीय वर्तुळातून उपस्थित केला जात आहे. परंतु राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीमुळे ही भेट अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.