मुंबई: नांदेडमधील घटना (Nanded Civil Hospital) सरकारने गांभीर्याने घेतली असून त्या घटनेची चौकशी करण्यात येणार आहे. चौकशी झाल्यानंतर त्यावर योग्य ती कारवाई करणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं. नांदेडमधील घटनेच्या ठिकाणी राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ आणि गिरीश महाजन हे पोहोचले असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.


नांदेडमधील  (Nanded) घटनेवर आज राज्याच्या मंत्रिमंडळात चर्चा झाल्याचं सांगत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, नांदेडच्या घटनेची चौकशी सुरू आहे. आज सकाळीच राज्याच्या सचिवांकडून त्याची माहिती घेतली आहे. त्या ठिकाणी औषधांची कोणतीही कमतरता नव्हती. औषधांसाठी 12 कोटी रुपये आधीच मंजूर झाले होते. काही वृद्धांना हृदयविकाराचा त्रास होता. त्यानंतर ही घटना घडली. नांदेडमधील घटनेचा आढावा घेण्यात येणार असून त्यासाठी राज्याचे दोन मंत्री त्या ठिकाणी पोहोचले आहेत.


महाजन आणि मुश्रीफ हे नांदेडमध्ये


नांदेडमधील घटनेनंतर राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि हसन मुश्रीफ हे त्या ठिकाणी पोहोचले आहेत. त्या ठिकाणी मृत्यू कसे झालेत याची माहिती ते घेणार असून योग्य त्या सूचना करणार असल्याची माहिती आहे. 


केंद्राने अहवाल मागवला 


नांदेडच्या शासकीय रुग्णालयात धक्कादायक 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी समोर आली अन् राज्यभरात खळबळ उडाली. त्यानंतर पुढच्या 24 तासात पुन्हा सात जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं. यामध्ये 4 बालकांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. यावर राज्यभरात संतप्त प्रतिक्रिया उमटत असून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवारांनी रुग्णालय प्रशासनाला अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत.


यावेळी भारती पवार म्हणाल्या की, नांदेड रुग्णालयात रुग्णालयातील घटना अत्यंत दुर्दैवी असून संबंधित अधिकाऱ्यांशी बोलणे झाले असून त्या बाबतीत खुलासा मागवला आहे. नेमके कोणते पेशंट होते? कधी ऍडमिट झाले होते? ही सर्व माहिती मागविण्यात आली असून नांदेडसह संभाजीनगरमधील  रुग्णांच्या मृत्यूप्रकरणाची केंद्राकडून दखल घेण्यात आली असून लवकरच सविस्तर अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल असे भारती पवार यांनी म्हटले आहे. 


दरम्यान नांदेडच्या घटनेवरून राज्य सरकारवर विरोधी पक्षांनी टीकेची झोड उठवली आहे. राज्य सरकार गंभीर नसल्याने ही वेळ आल्याचं सांगत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी केली आहे.


ही बातमी वाचा: