मुंबई : घरगुती तसेच पाच दिवस आणि गौरी गणपतींना (Ganpati) आज निरोप देण्यात येत आहे. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या!' या जयघोषात लाडक्या बाप्पाला निरोप (Ganpati Visarjan) दिला जातोय. पाच दिवसांचा पाहुणाच घेऊन पुढच्या वर्षी लवकर येण्यासाठी बाप्पा निघाले असून अनेक ठिकाणी विसर्जनाला देखील सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतय. प्रशासनाकडून विसर्जनासाठी योग्य ती तयारी केली आहे. तसेच अनेक ठिकाणी कृत्रिम तलांवाची निर्मिती देखील करण्यात आलीये. त्याचप्रमाणे कोकणात देखील अगदी पारंपारिक पद्धतीने लाडक्या बाप्पाला निरोप दिला जातोय. ढोल-ताशांच्या गजरात, टाळ-मृदृगांच्या सुरात बाप्पाचं विर्सजन करण्यास सुरुवात झालीये.  लाडक्या बाप्पाला अगदी भक्तीभावने आणि जड अंत: करणाने निरोप दिला जातोय. 


मुंबईतील चौपाट्यांवर देखील अशीच काहीशी परिस्थिती आहे. दादर, गिरगाव, जुहू चौपाटीवर सध्या विसर्जनाची लगबग सुरु झालीये. त्याच पार्श्वभूमीवर प्रशासन देखील सज्ज झाल्याचं चित्र सध्या आहे. तर विसर्जनाला कोणत्याही प्रकारचं गालबोट लागू नये यासाठी पोलीस प्रशासन तैनात झालं आहे. तर विसर्जनासाठी आवश्यक त्या सोयी सुविधांची तरतूद देखील चौपाट्यांवर प्रशासनाकडून करण्यात आलीये. 


दादर आणि चौपाटी सज्ज


पाच दिवसाच्या बाप्पाला निरोप देण्यासाठी दादर चौपाटी सज्ज झालीये. दादर चौपाटीवर हजारो गणपतींचं विसर्जन करण्यात येतं. त्याचप्रमाणे गिरगाव चौपाटीवर देखील पाच दिवसांच्या सार्वजनिक आणि घरगुती गणपतांनी निरोप दिला जातो. त्यामुळे विसर्जनासाठी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळण्यासाठी प्रशासनाकडून तयारी करण्यात आलीये. त्यासाठी चौपाट्यांवर पोलिस आणि पालिकेने नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. तसेच सुमारे तीनशे पोलिसांचा फौजफाटा यावेळी तैनात करण्यात आलाय. शंभर पेक्षा जास्त सिसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर यावेळी या गर्दीवर असणार आहे.  तर कोणत्याही भाविकांना समुद्रामध्ये जाण्यासाठी परवानगी देण्यात येणार नाही. त्यासाठी शंभर स्वंयमसेवक चौपट्यांवर असणार आहेत. जे बाप्पाची मूर्ती पाण्यामध्ये घेऊन जातील आणि वसर्जित करतील. 


मुंबई महापालिकेने प्रत्येक प्रभागात कृत्रिम तलावाची व्यवस्था केली आहे. नागरिकांना या कृत्रिम तलावात बाप्पांचे विसर्जन करावे, असे आवाहनही मुंबई महापालिकेने केले आहे. मुंबई महापालिकेच्या मदतीला स्वयंवसेवी संस्थादेखील आहेत. त्याशिवाय, विसर्जन मिरवणुकी दरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी मुंबई पोलिसांनी पुरेसा बंदोबस्त ठेवला आहे. 






वाहतूक कोंडीचा त्रास 


मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळपासूनच प्रचंड वाहतुक कोंडी झाली आहे. मालजीपाडा-ससुनवघर, बापाणे ब्रीज आणि फाउन्टन हॉटेल जवळील महामार्गावर पडलेल्या खड्डयामुळे ही वाहतुक कोंडी झाली. . शनिवार विकेंड असल्याने, तसेच आज गौरी गणपतीचे विसर्जन असल्याने वाहने महामार्गावर मोठ्या प्रमाणात निघाली आहेत. त्यामुळे वाहतूक कोंडीचा त्रास अनेकांना सहन कारावा लागतोय. 


हेही वाचा : 


Ganesh Chaturthi 2023 : महाभारत लिहिताना जेव्हा गणेशाचे तापमान वाढले, वेद व्यासांचे उपाय, आणि 'ही' परंपरा सुरू झाली, पौराणिक कथा पाहा