Ajit Pawar On Election : राज्यामध्ये येत्या काही दिवसात मनपा आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचा धुरळा उडणार आहे. या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढणार का? असा सवाल उपस्थित होत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्वाचं वक्तव्य केलं आहे. अजित पवार म्हणाले की, आगामी निवडणुकीत राज्यस्तरावर महविकास आघाडीनं एकत्र लढली जावी असे आम्ही प्रयत्न करत आहोत. मात्र जिल्हा स्तरावर स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन निर्णय घ्यायचा आहे, असं अजित पवार म्हणाले. 


काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्यावर बोलताना अजित पवार म्हणाले की, नाना पटोले यांनी खंजीर खुपसण्याचं वक्तव्य केलं हे हास्यास्पद आहे. मात्र नाना पटोले कुठल्या पक्षातून आले आहेत, हे सर्वांना माहिती आहे. मग भाजपने म्हणायचं का की नाना पटोले यांनी पाठीत खंजीर खुपसला, असा टोला त्यांनी लगावला.  अजित पवार म्हणाले की, राज्य स्तरावर वेगळे निर्णय असतात मात्र स्थानिक पातळीवर वेगळे निर्णय होतं असतात. काँग्रेसला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे तसाच आम्हाला देखील पक्ष वाढवण्याच्या अधिकार आहे. राज्यस्तरावर आमची शरद पवार यांनी बैठक घेतली होती. त्यामधे त्यांनी देखील आम्हाला हेच सांगितलं आहे. नाना पटोले यांनी सांगावं की त्यांनी आधी काँग्रेस सोडून भाजप, मग भाजप सोडून काँग्रेसमध्ये आले. झाकली मूठ सव्वा लाखाची असते, असंही ते म्हणाले. 1999  ते 2014 आम्ही आघाडीचं सरकार चालवलं त्यावेळी देखील आम्ही एकमेकांविरोधात निवडणुका लढवल्या आहेत, असंही ते म्हणाले. 


वेगळ्या भूमिकेतून उत्तर प्रदेश सरकारनं निर्णय घेतला असेल तर....


योगी सरकारचं कार्यालय मुंबईत सुरु करण्यासंदर्भात बोलताना अजित पवार म्हणाले की, कुणी कुठं कार्यालयं काढावं हा ज्याचा त्याचा अधिकार. आपलं दिल्लीत कार्यालय आहे  तर आपल्या नवी मुंबईत अनेक राज्याची कार्यालयं आहेत. मात्र वेगळ्या भूमिकेतून उत्तर प्रदेश सरकारनं निर्णय घेतला असेल तर मग आम्ही देखील उत्तर प्रदेशमध्ये कार्यालयं काढू शकतो, असं ते म्हणाले. 


पहिल्यापासून शरद पवार यांची सर्वसमावेशक भूमिका


शरद पवार यांच्यावर जातीपातीचं राजकरण करतात असा आरोप होतो. मात्र पहिल्यापासून शरद पवार यांनी सर्वसमावेशक भूमिका घेतली आहे, असं अजित पवार म्हणाले. सर्वांनी मिळून जातीय सलोखा आणि आपलेपणा निर्माण करण्यासाठी प्रयत्न करूयात, असं ते म्हणाले.  नुकताच सुप्रीम कोर्टानं ओबीसी आरक्षण बाबत निर्णय दिला आहे. कोर्टाचा निर्णय सर्वांना मान्य करावा लागेल, असंही ते म्हणाले.  


शेतकऱ्यांनो टोकाची भूमिका घेऊ नका


बीडमधील शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या घटनेवर बोलाना ते म्हणाले की, राज्यात बीड, सातारा भागातील शेतकऱ्यांना चिंता आहे की अजूनही उस तुटला नाही. मग पुढे काय होणार मात्र आम्ही जास्तीत जास्त ऊस घेउन जात आहोत. बीडमध्ये एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. मात्र माझी विनंती आहे टोकाची भूमिका घेऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं.