मुंबई : तुम्ही समोर येऊन सांगितला तर मी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देतो, असं बंडखोर आमदारांना सांगत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आजच आपण वर्षा निवासस्थान सोडत असून 'मातोश्री'वर जाणार असल्याचं जाहीर केलं. हे ऐकताच 'वर्षा' ते 'मातोश्री'च्या दरम्यानच्या रस्त्यावर शिवसैनिकांनी एकच गर्दी केली. कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला..., आवाज कुणाच... शिवसेनेचा या घोषणांनी हा परिसर दुमदुमला. 


उद्धव ठाकरे यांनी आज 'वर्षा' निवासस्थान सोडलं आणि 'मातोश्री'कडे निघाले. उद्धव ठाकरे 'वर्षा'मधून बाहेर आल्यावर त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. उद्धव ठाकरे हे वर्षावरून बाहेर येताना लोकांनी एकच गर्दी केली. लोकांनी एवढी गर्दी केली होती की उद्धव ठाकरेंना त्यांच्या गाडीपर्यंतही पोहोचता येत नव्हतं. त्यावेळी रश्मी ठाकरे, आदित्य ठाकरे आणि तेजस ठाकरे त्यांच्यासोबत होते. यावेळी लोकांनी शिवसेनेच्या आणि उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ घोषणा दिल्या. उद्धव ठाकरे आम्ही तुमच्या सोबत आहोत असा विश्वास शिवसैनिकांनी दिला. 


 






आवाज कुणाचा...शिवसेनेचा, उद्धव साहेब तुम आगे बढो...हम तुम्हारे साथ है.... अशा घोषणा देण्यात आल्या. कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला..., कोण आला रे कोण आला... शिवसेनेचा वाघ आला या घोषणेने हा परिसर दुमदुमला. यावेळी शिवेसेनेच्या महिला कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केल्याचं दिसून आलं. 


 






मुख्यमंत्र्यांचा ताफा ज्या ठिकाणाहून जात असतो तो रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने क्लिअर केला जातो. पण या रस्त्यावर शिवसैनिकांची प्रचंड गर्दी झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे वर्षा ते मातोश्री हे अंतर गाठायला मुख्यमंत्र्यांना तब्बल सव्वा तास लागला. या दरम्यान तीन वेळा मुख्यमंत्री गाडीतून बाहेर उतरले आणि त्यांनी शिवसैनिकांशी संवाद साधला. तसेच आदित्य ठाकरे यांनीही एका ठिकाणी गाडीच्या टफावर जाऊन लोकांना अभिवादन केलं. 


उद्धव ठाकरे यावेळी भावूक झाल्याचं दिसून आलं. त्यामुळे शिवसेना आणि बंडखोर आमदारांच्या संघर्षाला आता भावनिक रुप आल्याचं पाहायला मिळतंय. तिकडून काय सांगता, तोंडावर सांगा, मी राजीनामा द्यायला तयार आहे असं उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना म्हटलं होतं.