Shiv Sena MLA : बंडखोर आमदारांच्या विरोधात मुंबई, पुण्यासह राज्यभरात शिवसैनिक रस्त्यावर उतरले आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर आल्या आहे. एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर शिवसेना आमदारांच्या सुरक्षेच्या प्रश्नावर बरीच खलबतं झाल्यानंतर आता या आमदारांना थेट केंद्राकडून सुरक्षा पुरवण्यात आली आहे. शिंदे गटातील पंधरा आमदारांच्या घरी केंद्र सरकारकडून सुरक्षा पुरविण्यात येणार आहे. आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आलं आहे. 


काल शिंदे गटातील 15 आमदारांनी सुरक्षेच्या कारणास्तव केंद्रीय गृह सचिव  आणि राज्यपाल यांना पत्र लिहिलं होतं त्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. काल झालेल्या तोडफोडीच्या आणि हिंसक घटनेनंतर केंद्र सरकारची शिंदे गटातील आमदारांना सुरक्षा पुरविण्यात आली आहे. 


आज संध्याकाळपर्यंत 15 आमदार यांच्या घरी सीआरपीएफचे जवान तैनात होणार असल्याची खात्रीलायक सूत्रांची माहिती आहे. सध्या आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. आता बाकीचे आमदार कोण आहेत याची माहिती देखील लवकरच मिळणार आहे. दादर भागात राहणाऱ्या आमदार सदा सरवणकर यांच्या घराबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. तसेच त्यांच्या पूर्ण घराला बॅरिकेट्स लावण्यात आलं आहे. 


वैजापूरचे शिवसेना आमदार रमेश बोरणारे यांच्या कार्यालयाला केंद्राची सुरक्षा 


एकनाथ शिंदे यांच्यासोबत बंड केलेल्या आमदारांच्या यादीत असलेले वैजापूरचे आमदार रमेश बोरणारे यांच्या कार्यालयाला आणि घराला केंद्राची सुरक्षा देण्यात आली आहे. काही वेळापूर्वी वैजापूरमध्ये CRPFचे जवान दाखल झाले असून, त्यांनी बोरनारे यांच्या घराचा ताबा घेतला आहे.


या आमदारांच्या घरी CRPF तैनात
रमेश बोरनारे (Ramesh Bornare)
मंगेश कुडाळकर Mangesh Kudalkar
संजय शिरसाट Sanjay Shirsat
लता सोनावणे Latabai Sonawane
प्रकाश सुर्वे Prakash Surve
सदा सरवणकर Sadanand Saranavnkar
योगेश कदम Yogesh  Kadam
प्रताप सरनाईक Pratap Sarnaik
यामिनी जाधव Yamini Jadhav
प्रदीप जायस्वाल Pradeep Jaiswal
संजय राठोड Sanjay Rathod
दादाजी भुसे Dadaji Bhuse
दिलीप लांडे Dilip Lande
बालाजी कल्याणकर Balaji Kalyanar
संदिपान भुमरे Sandipan Bhumare


कटकारस्थानात भाजप असल्याचं स्पष्ट झालं- शिवसेनेची टीका


आमदारांना केंद्राची सुरक्षा मिळाल्यानंतर शिवसेनेकडून भाजपवर टीका करण्यात आली आहे. शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे की, आता या कारस्थानामागे भाजप असल्याचं स्पष्ट झालं आहे. राज्यातील सुरक्षा व्यवस्थेवर मुद्दाम अविश्वास दाखवला जात आहे. आता केंद्राची ढवळाढवळ महाराष्ट्राला कळली आहे, असंही अरविंद सावंत यांनी म्हटलं आहे. 


एकनाथ शिंदेंचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांवर आरोप, गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण

राजकीय आकसाने मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी आमदारांचे संरक्षण काढून घेतले असल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता.मागील अडीच वर्षात महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडून अशाच प्रकारे खच्चीकरण करण्यात आल्याचा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला होता. कोणत्याही बंडखोर आमदार आणि मंत्र्यांची सुरक्षा काढण्यात आलेली नाही. एकनाथ शिंदे यांच्याकडून जाणीवपूर्वक चुकीचे माहिती पसरवली जात आहे, असा दावा गृहखात्याने केला होता.