Mumbai News: बलात्कार झाल्यानंतर आत्महत्या केलेल्या प्रेयसीला न्याय मिळावा यासाठी मंत्रालयाचे उंबरठे झिजवणाऱ्या प्रियकराने आज मंत्रालयात (Maharashtra Mantralaya) आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मागील तीन वर्षांपासून तिला न्याय मिळावा यासाठी प्रियकराचे प्रयत्न सुरू होते. मात्र, प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलले. 


मंत्रालयात आज पाचव्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याने एकच खळबळ उडाली. बापू नारायण मोकाशी (वय 43 वर्षे) असे या तरुणाचे नाव आहे. बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात पारगाव जोगेश्वरी गावातील रहिवासी आहे. 


बापू मोकाशी यांनी पाचव्या मजल्यावरून उडी मारली. मात्र, मंत्रालयात लावण्यात आलेल्या जाळीवर पडला. त्यामुळे त्याला फारशी दुखापत झाली  नसल्याची प्राथमिक माहिती आहे पोलिसांनी या प्रकरणी त्याला ताब्यात घेतले आहे. त्याला वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहे.


मागील काही दिवसातील ही दुसरी घटना आहे. आज मंत्रालयात राज्य मंत्रिमंडळाची बैठक होती. त्यानिमित्ताने मंत्रालयात मोठी गर्दी उसळली होती. त्यातच अचानकपणे बापू मोकाशी यांनी आपल्या मागण्यांवर कार्यवाही होत नसल्याने उडी मारली. या तरुणाने उडी मारल्यानंतर मंत्रालयात एकच खळबळ उडाली. मंत्रालयातील पोलिसांनी तात्काळ सुरक्षा जाळी असलेल्या ठिकाणी धाव घेतली. मंत्रालयातील सुरक्षा जाळीवर पडल्यानंतरही बापू मोकाशी काही वेळ तिथेच रेंगाळत होते. त्याच दरम्यान त्यांनी मोठ्याने आरडाओरडा सुरू केला. या दरम्यान पोलिसांनी त्याची समजूत काढण्याचे प्रयत्न सुरू केले. अखेर पोलिसांनी समजूत काढल्यानंतर ते सुरक्षा जाळीवरून बाहेर आले. बाहेर आल्यानंतर काही वेळ पोलिसांनी त्याची विचारपूस केली आणि ताब्यात घेतले. पोलिसांनी त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेले आहे. 


मागील काही दिवसातील ही दुसरी घटना असल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. आज झालेल्या घटनेमुळे मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कोरोना महासाथीची लाट ओसरल्यानंतर मंत्रालयात सामान्यांना प्रवेश सुरू करण्यात आला होता. मात्र, मागील काही महिन्यांपासून मंत्रालयात सामान्यांची गर्दी वाढत असल्याने गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाने काही नियम लागू केलेत. 


विधीमंडळ अधिवेशन काळातही आत्महत्येचा प्रयत्न


ऑगस्ट महिन्यात झालेल्या विधीमंडळ अधिवेशना दरम्यान मंत्रालयात एकाने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मंत्रालयाच्या टेरेसवर चढून एका व्यक्तीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांनी त्याला सुखरुप खाली उतरवले.