मुंबई : गुढीपाडव्याच्या मुहुर्तावर मुंबई मेट्रोच्या 2-ए आणि मेट्रो 7 या मार्गिकेचं लोकार्पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. मात्र मेट्रो मार्गांच्या उद्धाटनाआधीच शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली. कारण मुंबई मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण देण्यात आले नाही. भाजप शिवसेना काळात सुरू मेट्रोचं काम झालं होतं.
मुंबईत गुढी पाडव्याच्या मुहुर्तावर मेट्रोचे उद्घाटन होणार आहे. मात्र त्या आधी श्रेयवादाची गुढी उभारली आहे. भाजपच्या वतीने आज मुंबईत अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असून 'काम केलंय मुंबईने पाहिलंय' असं लिहिण्यात आलं आहे. भाजप सेना काळात सुरू झालं होतं मेट्रोच्या कामाला भाजपनं गती दिली आणि अंतीम टप्प्याकडे नेलं असा दावा भाजपकडून करण्यात येतोय. यातच आज वांद्रे येथे लागलेले फडणवीसांचे बॅनर यावरून श्रेयवाद रंगला आहे. आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना कार्यक्रमालाच निमंत्रण नाही. विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना निमंत्रण दिलं नसलं तरीही विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना मात्र कार्यक्रमासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.
श्रेयवादाची लढाई नेमकी कशामुळे?
- देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना मेट्रो 7 आणि मेट्रो 2 अ या दोन्ही मार्गांचे भूमीपूजन ऑक्टोबर 2015 मध्ये झाले होते.
- 2016 मध्ये या दोन्ही मेट्रोच्या कामाला प्रत्यक्ष सुरुवात झाली.
- 2021 पर्यंत हे काम पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र कोरोना आणि टाळेबंदी यामुळे या मेट्रो मार्गाच्या कामावर परिणाम झाला आणि प्रकल्प सुरू होण्यास उशीर झाला.
- देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 337 कि.मी मेट्रो प्रकल्प मंजूर करण्यात आले.
- त्यासाठी 1,40, 433 कोटी रुपये मंजूर करण्यात आले
- या मंजूर केलेल्या निधीचा उल्लेखही बॅनरमध्ये करण्यात आला आहे.
येणाऱ्या काही काळात मुंबई महापालिकेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई मेट्रोचा प्रकल्प पूर्ण केला याचं श्रेय घेण्यासाठी शिवसेना आणि भाजपची चढाओढ सुरू आहे. आता श्रेयवादाच्या या लढाईत मुंबईकर नेमकं कुणाच्या बाजूने कौल देतात? हे पाहणे महत्त्वाचं आहे.
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha