Lingayat Religion Mahamorcha: अखिल भारतीय लिंगायत समाज समन्वय समितीच्या वतीने स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतर प्रथमच मुंबई (Mumbai) येथे महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. लिंगायत समाजाला लिंगायत धर्मास संवैधानिक मान्यता द्यावी. तर केंद्र व राज्य सरकारने अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी या महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तर या मोर्च्यात किमान पाच लाख समाजबांधव सहभागी होणार असून, समाजामधील खासदार व आमदार यांचा देखील सहभाग असणार असल्याची माहिती अखिल भारतीय लिंगायत समाज समन्वय समितीच्या वतीने देण्यात आली आहे. 


अखिल भारतीय लिंगायत समाज समन्वय समितीचे राष्ट्रीय समन्वयक अविनाश भोसीकर यांच्या उपस्थितीत उस्मानाबाद येथील पवन राजे कॉम्प्लेक्स मधील समर्थ हॉलमध्ये पत्रकार परिषद पार पडली आहे. यावेळी उस्मानाबाद लिंगायत समनवय समितीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना भोसीकर म्हणाले की, देशाची संस्कृती हिंदू असून आम्हाला ती मान्य आहे. परंतू लिंगायत धर्माची संस्कृती वेगळी असल्यामुळे लिंगायत धर्माला केंद्र सरकारने संवैधानिक मान्यता द्यावी. तर लिंगायत समाजाला केंद्र व राज्य सरकारने अल्पसंख्यांक समाजाचा दर्जा जाहीर करावा या मागणीसाठी गेल्या 5 वर्षापासून या समाजाचे महाराष्ट्र, कर्नाटक व तेलंगणा या राज्यात 22 महामोर्चे निघाले असल्याचं अविनाश भोसीकर म्हणाले. 


'या' आहेत मागण्या...


पुढे बोलतांना  अविनाश भोसीकर म्हणाले की, तर लिंगायत समाजामध्ये सुशिक्षित बेकारांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे त्यांना उद्योग उभे करून विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, मंगळवेढा येथे महात्मा बसवेश्वर यांचे स्मारक उभारण्यात यावे, राज्यात व देशात लिंगायत समाजाची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. लिंगायत समाजाचे खासदार व आमदार आहेत. विशेष म्हणजे ते समाजाच्या मतावर निवडून गेले. त्यांनी समाजाच्या हिताचे प्रश्न संसद व विधानसभेत कधीच मांडले नाहीत. आजपर्यंत राजकीय मंडळीकडून लिंगायत समाजाला आश्वासनाशिवाय काहीही मिळाले नसल्याचे  अविनाश भोसीकर म्हणाले.  


कर्नाटकातील लिंगायत बांधवांचाही सहभाग 


लिंगायत समाजाला लिंगायत धर्मास संवैधानिक मान्यता द्यावी. तर केंद्र व राज्य सरकारने अल्पसंख्यांक दर्जा जाहीर करावा यासह इतर मागण्यांसाठी मुंबईत मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तर 29 जानेवारी रोजी मुंबईत काढण्यात येणाऱ्या या मोर्चामध्ये लिंगायत समाजामधील सर्व जाती व पोट जाती सहभागी होणार असून महाराष्ट्र लगत असलेल्या कर्नाटक भागातील लिंगायत बांधव देखील यामध्ये सामील होणार असल्याचे भोसीकर यांनी सांगितले.