मुंबई : मुंबई विद्यापीठाचा दूर व मुक्त अध्ययन संस्था व बॉम्बे स्टॉक एक्सचेंजच्या बीएससी इन्स्टिटयूट लिमिटेड यांच्यात शिक्षण व रोजगाराच्या संधीसाठी दोन सामंजस्य करार करण्यात आले. मुंबई विद्यापीठाच्या वतीने कुलसचिव सुधीर पुराणिक व बीएससी इन्स्टिटयूट लिमिटेडच्यावतीने व्यवस्थापकीय संचालक व मुख्य कार्यकारी अधिकारी अंबरीश दत्ता यांनी या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या. याप्रसंगी आयडॉलचे संचालक डॉ. प्रकाश महानवर उपस्थित होते.
बीएससी इन्स्टिटयूट लिमिटेड ही संस्था बॉम्बे स्टॉक एक्सचेंजची आर्थिक आणि भांडवली बाजारासंबंधी प्रशिक्षण देणारी प्रमुख संस्था आहे आणि विद्यार्थ्यांना रोजगारक्षम कौशल्य आणि सक्षमतेवर आधारित शिक्षण देऊन उद्योगासाठी तयार करण्याचे कार्य करीत आहे. वित्तीय, भांडवली बाजार, व्यवसाय पत्रकारिता, बँकिंग आणि इतर विविध क्षेत्रातील अत्याधुनिक अभ्यासक्रमांसाठी बीएससी इन्स्टिटयूट जागतिक स्तरावर ओळखली जाते.
शिक्षणविषयक करार
शिक्षणविषयक करारामध्ये मुंबई विद्यापीठाची दूर व मुक्त अध्ययन संस्था व बीएससी इन्स्टिटयूट लिमिटेड यांच्या संयुक्त सहकार्याने वित्तीय, बँकिंग, अकाउंटिंग,भांडवली बाजार, वित्तीय सेवा, डेटा सायन्स व वित्तीय तंत्रज्ञान यासंबंधित विविध क्षेत्रातील अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. प्रारंभी सहा अभ्यासक्रम दूरस्थ व ऑनलाईन माध्यमातून सुरु होणार आहेत. हे अभ्यासक्रम पदविका व प्रमाणपत्र असतील. म्युच्युअल फंडस, इन्श्युरन्स, सेक्युरिटीज अॅन्ड कार्पोरेट लॉ, फिनान्शियल मार्केट्स, ग्लोबल अकाउंटिंग व डेटा सायन्स हे अभ्यासक्रम आहेत. या अभ्यासक्रमांना विद्यापीठाच्या अधिष्ठाता मंडळाची मान्यता मिळाली असून लवकरच विदवत परिषदेत मान्यतेसाठी ठेवले जाणार आहेत.
सुरु होणारे सहा नवीन अभ्यासक्रम
1. म्युच्युअल फंड्स प्रमाणपत्र अभ्यासक्रम
2. इन्शुरन्स प्रमाणपत्र अभ्यासक्रम
3. सेक्युरिटीज अँड कार्पोरेट लॉ प्रमाणपत्र अभ्यासक्रम
4. फिनान्शियल मार्केट्स पदविका अभ्यासक्रम
5. ग्लोबल अकाउंटिंग पदविका अभ्यासक्रम
6. डेटा सायन्स पदविका अभ्यासक्रम
रोजगार संधी विषयक करार
रोजगार संधीविषयक करारामध्ये आयडॉलमधील शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना बीएससी इन्स्टिटयूट लिमिटेडमार्फत बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा क्षेत्रातील विविध उद्योग व कंपन्यांमध्ये इंटर्नशिप आणि प्रशिक्षणाच्या संधी उपलब्ध केल्या जातील. बीएससी इन्स्टिटयूट आयडॉलच्या विद्यार्थ्यांना एक डिजिटल प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देणार आहे. यातून आयडॉलच्या विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध होतील.