Mahim Majar  : माहिमच्या (Mahim) वादग्रस्त मजारीच्या ठिकाणी मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक दाखल झालं आहे. पालिकेचे अनेक कामगार आणि जेसीबी देखील माहिमच्या किनाऱ्यावर आणण्यात आलं आहे. दरम्यान, माहिममधील वादग्रस्त मजारीबद्दल सूत्रांनी एबीपी माझाला महत्त्वाची माहिती दिली आहे. कबर खूप जुनी असून, तिची नोंदही करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात मजारीभोवती अनधिकृत बांधकाम करण्यात आलं आहे. केवळ हेच बांधकाम आज पाडण्यात येणार आहे. मजारीला हात लावला जाणार नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.  


ही जागा 600 वर्षं जुनी, विश्वस्तांचा दावा


माहिम समुद्रातील कथित मजारीचं मॅपिंग करण्यात आलं  आहे.  महाराष्ट्र मॅरिटाईम बोर्डाचे अधिकारी माहीम समुद्रातील ठिकाणावर पोहोचले आहेत. राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मॅरिटाईम बोर्डाला जाग आल्याचे बोलले जात आहे. माहिमच्या वादग्रस्त मजारीच्या ठिकाणी मुंबई महापालिकेचं अतिक्रमण विरोधी पथक दाखल झालं आहे. तसेच एक जेसीबी देखील त्या ठिकाणी तयार ठेवण्यात आलं आहे. दरम्यान, माहीम समुद्रामधील या ठिकाणावर माहिम दर्गा ट्रस्टनं मोठा दावा केला आहे. ही जागा 600 वर्षं जुनी आहे. राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणं ती आताच बांधलेली नाही. मुळात, हजरत मकदूम अली शाह हे याच जागी बसून हजरत ख्वाजा खिजर अली शाह यांच्याकडून शिक्षण घ्यायचे. ही ऐतिहासिक जागा आहे. तिथं दर्गा उभारण्याचा आमचा कुठलाही विचार नाही, असं माहीम दर्ग्याचे विश्वस्त सुहेल खंडवानी यांनी सांगितलं.


राज ठाकरे नेमकं काय म्हणाले होते?


मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल (22 मार्च) झालेल्या गुढी पाडव्याच्या मेळाव्यात खळबळजनक दावा केला आहे. माहिमजवळ समुद्रात अनधिकृत दर्गा उभारला जात असल्याचा दावा राज ठाकरे यांनी केला आहे. महत्त्वाचं म्हणजे राज ठाकरे यांनी त्याचा व्हिडीओच जाहीरपणे दाखवला. तसंच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या अनधिकृ दर्ग्यावर कारवाई करावी, अशी थेट मागणी राज ठाकरेंनी केलीय. ही मागणी करताना, राज ठाकरे यांनी सरकारला एका महिन्याचा अल्टिमेटम देखील दिला आहे. जर हा दर्गा हटवला नाही तर त्याच्या शेजारी गणपतीचं मंदिर उभं करण्याचा इशारा राज  ठाकरे यांनी दिला आहे.


महत्त्वाच्या बातम्या:


Mahim Dargah : राज ठाकरेंनी दाखवलेली जागा 600 वर्षे जुनी, तिथे दर्गा बांधणार नाही; माहिम दर्गा ट्रस्टची प्रतिक्रिया