Mahim Dargah : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी माहिमच्या समुद्रातील दर्गा अवैध असल्याचा आरोप केल्यानंतर माहिम दर्गा ट्रस्टने (Mahim Dargah Trust) पहिली प्रतिक्रिया दिली आहे. "आम्ही त्या ठिकाणी दर्गा बांधणार नाही. ती जागा चिल्ला आहे, त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिलं जात होतं," असं स्पष्टीकरण मखदूम शाह बाबा रदियल्लाहुअनहु अर्थात माहिम दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांनी दिलं आहे. 



त्या ठिकाणी दर्गा बांधणार नाही : माहिम दर्गा ट्रस्ट


राज ठाकरेंनी मेळाव्यात व्हिडीओद्वारे दाखवलेली जागा ही 600 वर्ष जुनी आहे. ही जागा ऐतिहासिक आहे. आम्ही त्या ठिकाणी दर्गा बांधणार नाही. ती जागा चिल्ला आहे, त्या ठिकाणी धार्मिक शिक्षण दिलं जात होतं. तसंच त्या जागेच्या आजूबाजूला नवीन बांधकाम झालं असेल तर सरकारने त्यावर नक्की कारवाई करावी, असं माहिम दर्गा ट्रस्टचे विश्वस्त सोहेल खंडवानी यांनी सांगितलं.


मुंबई पोलीस आयुक्तांकडून दर्ग्याचं निरीक्षण करण्याचे आदेश


दरम्यान राज ठाकरे यांच्या दाव्याची दखल मुंबई पोलीस आयुक्तांनी घेतली आहे. मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांनी अतिरिक्त पोलीस आयुक्तांना माहिम समुद्रातील या दर्ग्याचं निरीक्षण करुन अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. हा दर्गा अनधिकृत असेल तर याची विस्तृत माहिती मुंबई महापालिकेला दिली जाईल. त्यानंतर महापालिका आयुक्त यावर कारवाई करतील असं म्हटलं जात आहे.


मुंबई महापालिकेचं स्पष्टीकरण


दरम्यान राज ठाकरे यांच्या दाव्यानंतर मुंबई महापालिकेने देखील स्पष्टीकरण दिलं आहे. हे अनधिकृत बांधकाम हे समुद्रातील आतील भागात असल्याने ते मुंबई महापालिकेच्या हद्दीत येत नाही. मुंबईचे जिल्हाधिकारी यांच्या हद्दीत या संदर्भात कारवाईचे अधिकार आहेत, असं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेने दिलं आहे. मुंबई महापालिका आयुक्त हे मुंबई पोलीस आयुक्त त्यासोबतच मुंबई जिल्हाधिकारी यांच्यासोबत चर्चा करुन कारवाई संदर्भात निर्णय घेतील. मुंबई महापालिका कायद्यानुसार समुद्रकिनाऱ्याच्या आतमध्ये दहा मीटर अंतर जरी असल्यास मुंबई महापालिकेची हद्द किनाऱ्यालगतच असते. समुद्र जिथे सुरु होतो त्या समुद्राच्या आतील भागात मुंबई महापालिकेची हद्द संपते. त्यामुळे या हद्दीमध्ये मुंबई महापालिका कारवाई करु शकत नाही. तरीसुद्धा मुंबई महापालिका आयुक्त हे मुंबई पोलीस आयुक्त त्यासोबतच मुंबई जिल्हाधिकारी यांच्याशी चर्चा करुन कारवाई संदर्भात निर्णय घेतील, असं मुंबई महापालिकेच्या वतीने सांगण्यात आलं आहे. दरम्यान मुंबई महापालिका अधिकारी सुद्धा या संदर्भात पाहणी करणार आहेत.


राज ठाकरे काय म्हणाले होते? 


मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी माहिमच्या समुद्रात अवैध दर्गा उभारण्यात आल्याचं सांगितलं. "दोन वर्षात हा दर्गा उभारण्यात आला आहे," असं राज ठाकरे यांनी सांगितलं. तसंच येत्या महिन्याभरात जर कारवाई झाली नाही, माहिमच्या समुद्रातील दर्गा तोडला नाही तर त्याच्या बाजूला सर्वात मोठं गणपतीचं मंदिर उभं करणार असा इशारा देखील राज ठाकरे यांनी दिला. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पोलिसांनी यावर कारवाई केली नाही तर याद राखा," असंही राज ठाकरे म्हणाले.


यानंतर मुंबई पोलिसांनी खबरदारी म्हणून माहिम बीचवरील सुरक्षेत वाढ केली आहे. राज ठाकरे यांच्या आरोपांनंतर आता राजकारण तापलं आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर आज समुद्रातील या दर्ग्याची पाहणी करण्यासाठी जाणार आहेत.


हेही पाहा


माहीमच्या समुद्रात अनधिकृत दर्गाचे बांधकाम किती झाले? पाहा फोटो