Ganesh Chaturthi 2022 : आज दीड दिवसांच्या बाप्पांना आज निरोप देण्यात येणार आहे. साधारणपणे सायंकाळी चार वाजल्यानंतर गणपती बाप्पांच्या विसर्जनाला सुरुवात होईल. कोरोना महासाथीच्या आजाराचे संकट काही प्रमाणात दूर झाल्याने यंदाचा गणेशोत्सव उत्साहाने पार पडत आहे. दीड दिवसाच्या गणेश विसर्जनासाठी मुंबई महापालिकेने मोठ्या प्रमाणावर तयारी केली आहे. त्याशिवाय, स्वयंसेवी संस्था, गृहनिर्माण संस्थांनीदेखील कृत्रिम तलावाद्वारे विसर्जनाची तयारी केली आहे.
आज दीड दिवसाच्या गणपती बाप्पाच विसर्जन होत आहे. यासाठी मुंबईतल्या ठिकठिकाणी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात आलेली आहे. वरळीतील जांबोरी मैदान येथे मुंबई महानगरपालिका आणि वरळी सागरी कोळी महोत्सव समितीच्यावतीने कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेले आहेत. यंदा येथील दोन कृत्रिम तलाव हे शाडूच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत. त्यासोबतच प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींचे विघटन व्हावं यासाठी अमोनियम नायट्रेटचा प्रयोग याठिकाणी करण्यात आला आहे.
समुद्र किनाऱ्यावर विशेष व्यवस्था
मुंबईतील समुद्र किनारे आणि तलावांच्या ठिकाणी मुंबई महापालिकेच्यावतीने विसर्जनाची तयारी करण्यात आली आहे. गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम, जुहूसह समुद्र किनाऱ्यासह आरे कॉलनी इतर ठिकाणच्या तलावावर विसर्जनाची तयारी मुंबई महापालिकेने तयारी केली आहे. त्याशिवाय, विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. जीव रक्षक ही तैनात करण्यात आले आहेत. मुंबई महापालिकेने काही ठिकाणी कृत्रिम तलावाची निर्मिती केली आहे. यंदा दीड दिवसांच्या गणपतींच्या संख्येत वाढ झाल्याचे चित्र आहे. त्यामुळे दरवर्षीपेक्षा अधिक गर्दी होण्याची शक्यता आहे.
पाहा व्हिडिओ: दीड दिवसाच्या गणपती विसर्जनासाठी महापालिकेची तयारी, ठिकठिकाणी कृत्रिम तलावांची निर्मिती