ED Raids On Sanjay Raut: शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे अत्यंत जवळचे आणि विश्वासू नेते अशी ओळख असलेले संजय राऊत यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. आज सकाळी सात वाजल्यापासून ईडीचं पथक संजय राऊतांच्या भांडुपमधील 'मैत्री' बंगल्यात ठाण मांडून आहेत. त्या ठिकाणी संजय राऊत यांची चौकशी सुरू असताना दुसरीकडे दादर परिसरातील राऊतांच्या फ्लॅटमध्ये देखील ईडीचं पथक दाखल झाले आहे. त्याशिवाय, मुंबईतील ईडी कार्यालयाबाहेर देखील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.
शिवसेनेचे फायरब्रँड नेते, प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांची गेल्या 5 तासांपासून ईडीकडून चौकशी सुरु आहे. पत्राचाळा घोटाळाप्रकरणी ही चौकशी सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. ईडीच्या सात अधिकाऱ्यांकडून राऊतांच्या घरी झाडाझडती सुरु असल्याचे सूत्रांनी सांगितले. राऊतांच्या खोलीमधील कागदपत्रं आणि दस्ताऐवज ईडीकडून तपासले जात आहेत. याशिवाय राऊत यांच्या दादर इथल्या गार्डन कोर्ट इमारतीमधील फ्लॅटवरही ईडीकडून झाडाझडती सुरु आहे. तिकडे ईडीच्या कार्यालयाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे या सगळ्याप्रकरणी संजय राऊत यांना अटक होणार का याकडं लक्ष लागले आहे.
ईडी कार्यालयात नेणार?
संजय राऊत यांच्या बंगल्याबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त आहे. त्याशिवाय राज्य राखीव पोलीस दलही तैनात करण्यात आले आहे. तर, ईडी कार्यालयाबाहेर सीआरपीएफचे जवान तैनात करण्यात आले आहेत. त्यामुळे चौकशी संपल्यानंतर ईडी अधिकारी संजय राऊत यांना ताब्यात घेण्याची शक्यता आहे. राऊत यांना ताब्यात घेतल्यानंतर थेट ईडी कार्यालयात नेण्यात येईल आणि तिथे अटकेची कारवाई करण्यात येण्याची दाट शक्यता आहे.
संजय राऊत यांच्या घराबाहेर शिवसैनिक जमा झाले असून घोषणाबाजी सुरू आहे. शिवसैनिकांना अटकाव करण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. राऊत यांच्या बंगल्याच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आणि मागील दरवाजा जवळ पोलीस बंदोबस्त तैनात आहे. राऊतांना मागील दरवाज्यातून नेण्यात येण्याची शक्यता आहे.
नेमकं काय आहे पत्राचाळ प्रकरण?
पत्राचाळ जमीन घोटाळा (Patra Chawl Land Scam) 1,034 कोटी रुपयांचा आहे, असा आरोप करण्यात आला आहे. मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा (म्हाडा) भूखंड आहे. ईडीच्या आरोपानुसार, प्रवीण राऊत यांच्या गुरु आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीला ही चाळ विकसित करण्याचे काम देण्यात आले होते. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला, असा आरोप आहे.
प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. गुरु आशिष कन्स्ट्रक्शनला पत्रा चाळचे 3 हजार फ्लॅट बांधकाम करायचे होते, त्यापैकी 672 फ्लॅट येथील भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायची होती. परंतु 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे 25 टक्के शेअर एचडीआयएलला विकले. यानंतर 2011, 2012 आणि 2013 मध्ये भूखंडाचे अनेक भाग इतर खाजगी बिल्डर्सना हस्तांतरित करण्यात आले.