Narayan Rane On Uddhav Thackeray: शिवसेना आणि उद्धव ठाकरे (Shivsena Cheif Uddhav Thackeray) यांचं अस्तित्व उरलेलं नाही. दसरा मेळावा घेऊन बोलण्यासारखं आता त्यांच्याकडे आता उरले तरी काय, असा खोचक प्रश्न केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला. ठाकरेंच्या नेतृत्वातील शिवसेना संपली असून एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचीच शिवसेना खरी असल्याचा निर्वाळाही राणे यांनी यावेळी दिला. 


भाजपचे नेते निलेश राणे यांच्यावतीने कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी विशेष 'मोदी एक्स्प्रेस' सोडण्यात आली. यावेळी निलेश राणे यांच्यासह केंद्रीय मंत्री नारायण राणे हे देखील उपस्थित होते. पत्रकारांशी संवाद साधताना नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडले. आवाज कोणाचा याचं उत्तर मिळालं असून आता त्यांचा आवाज बंद झाला असल्याचे राणे यांनी म्हटले. शिवसेनेकडे आमदार राहिलेच नाही. शिवसेनेतील 40 हून अधिक आमदार एकनाथ शिंदे यांच्या गटात गेले आहेत. तर, उरलेले काहीजण शिंदे यांच्याकडे जाण्याच्या तयारीत असल्याचेही राणे यांनी म्हटले. 


उद्धव ठाकरे खरे गद्दार


उद्धव ठाकरे आणि त्यांच्या शिवसेनेचे अस्तित्व उरलं नाही. शिवाजी पार्कवर आता बोलण्यासारखं राहिलं काय असा खोचक प्रश्न त्यांनी केला. शिवसेनेची खरी गद्दारी उद्धव ठाकरे यांनी केली असल्याचे नारायण राणे यांनी म्हटले. उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद हे गद्दारी करून मिळवलं असल्याचा हल्लाबोल राणे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी भाजपसोबत, एकनाथ शिंदे यांच्यासोबत गद्दारी करून मुख्यमंत्रीपद मिळवलं असल्याचे राणे यांनी म्हटले. मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात त्यांनी जी कामं केली ती आपल्या निकटवर्तीयांसाठी केली असल्याचा आरोप राणे यांनी केला.


गणरायाच्या आशिर्वादाने सत्तांतर 


घरात बसून मुख्यमंत्रीपद हाताळता येत नसल्याचे नारायण राणे यांनी म्हटले. अडीच वर्षाच्या काळात राज्य सरकार 10 वर्ष मागे गेले. आता गणरायाच्या कृपेने मागील सरकार गेले आणि नवीन सरकार आले असल्याचे राणे यांनी म्हटले. महाराष्ट्रामध्ये भाजपची केंद्रात राज्यात सत्ता आहे. त्यामुळे आता राज्याचा सर्वांगीण विकास होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


दरम्यान, गणेशोत्सवाच्या निमित्ताने मुंबई ते कुडाळ दरम्यान निलेश राणे यांनी आरक्षित केलेल्या ट्रेनच्या सुविधेबाबत नारायण राणे यांनी समाधान व्यक्त केले. निलेश राणे यांनी प्रवाशांच्या सोयीसाठी पुढाकार घेतला असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही कोकणच्या विकासासाठी प्रयत्नशील राहणार असून याकडे आम्ही लक्ष देणार असल्याचे राणे यांनी सांगितले.