CM Eknath Shinde Mumbai Metro: उद्या विघ्नहर्त्याचे आगमन होत असून त्याने राज्यावरील विघ्न दूर केली आहेत. मेट्रो प्रकल्पामुळे (Mumbai Metro) वातावरणातील प्रदूषण कमी होईलच त्याशिवाय राजकीय प्रदूषणही कमी होणार असल्याचे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी शिवसेनेला टोला लगावला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई मेट्रो-3 च्या चाचणीला (Mumbai Metro Trial Run) हिरवा झेंडा दाखवला. त्यानंतर झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी भाषणात विरोधकांना टोले लगावले. 


मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले की, सार्वजनिक वाहतूक चांगली असेल तर त्याचा वापर सगळे करतील. आमचं सरकार आल्यानंतर अश्विनी भिडे यांना मेट्रोची जबाबदारी देण्याचा पहिला आदेश काढला. या कामासाठी झोकून देणारा अधिकारी हवा होता असे म्हणत त्यांनी अश्विनी भिडे यांचे कौतुक केले. अडीच वर्षापूर्वीच्या सरकारच्या पाच वर्षाच्या कालावधीत अनेक प्रकल्प सुरू झालेत. या प्रकल्पाची कामे जोरदार सुरू आहेत. त्यातील काही प्रकल्प आज पूर्णत्वास आहे. मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या प्रकल्पाला अनेकांनी विरोध केला होता. पण हा प्रकल्प सुरू केला. लवकरच नागपूर ते शिर्डी दरम्यानचा टप्पा सुरू होणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई मेट्रो हा मुंबईकरांच्या हिताचा प्रकल्प असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईतील वाहतूक कोंडीवर हा मेट्रो प्रकल्प रामबाण उपाय ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.   


पर्यावरणाचा समतोल राखणे हे सगळ्यांचे काम आहे. या ठिकाणी तीन रस्ते आहेत. जंगलात जाऊन पूर्णपणे वृक्षतोडी झाली नसल्याचे  मुख्यमंत्र्यांनी सांगितले. या प्रकल्पाची स्थगिती आम्ही उठवली आणि काम सुरू केले. लोकांच्या हितासाठी असणारे प्रकल्प पूर्ण करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. 


विरोधकांवर टीका 


आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय फटकेबाजीदेखील केली. त्यांनी म्हटले की,  विघ्नहर्त्याने राज्यावरील विघ्न दूर केली आहेत, आता चिंता वाटण्याचे कारण नाही. या प्रकल्पामुळे आता राजकीय प्रदूषणही बंद होईल असे त्यांनी म्हटले. आता पूर्ण बॅटिंग करण्यासाठी अडीच वर्ष शिल्लक आहेत. त्यामुळे आता कमी चेंडूत अधिक धावा करायच्या आहेत. अश्विनी भिडे यांनी आता आव्हानांची चिंता करू नये. आम्हीदेखील सगळी आव्हाने पार करत हे नवीन सरकार स्थापन केले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले.