मुंबई :  सध्या राज्यात काही भागात पावसानं दडी मारली आहे. तर काही भागात चांगला पाऊस झाला आहे. मुंबईसह उपनगर आणि ठाणे परिसरात पावसाची जोरदार बॅटिंग सुरु आहे आणि त्यामुळे मुंबई जाम झाली आहे. अंधेरी, दादर, परळ भागात पाणी साचलं आहे. दादर आणि परळमध्ये पाच किलोमीटरपर्यंत गाड्यांच्या रांगा लागल्यात मोठी वाहतूक कोंडी झाली आहे


मध्य रेल्वे मार्गावर दादर स्टेशनवर तांत्रिक बिघाड झाल्यानं लोकलच्याही रांगा लागल्या आहेत. सव्वा तासापासून प्रवासी लोकलमध्ये अडकले आहेत. लोकल सुरु होण्यासाठी आणखी वेळ  लागण्याची शक्यता आहे. मुंबईत रस्ते जाम आणि लोकल ठप्प झाले आहे जोरदार पावसात मुंबई तुंबली आहे. मुंबई, मुंबई उपनगरसह कोकणामध्ये पुढील 24 तासांत मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


मुंबईत सलग 12 तास पाऊस झाल्यानंतर मुंबई आणि आसपासच्या परिसरात पाणी साचले आहे. पहिल्यास मुसळधार पावसात मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे. मुंबईतील पावसाची आकडेवारी समोर आली आहे. मुंबईत सकाळी 8 ते रात्री 8.30 पर्यंत बारा तासात कुलाबा  176 मिमी पावसाची नोंद करण्यात आला आहे. मुंबईतील सांताक्रुज 137 मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.


पावसामुळे अंधेरी सब वे, हिंदमाता, सक्कर पंचायत वडाळा, एसआयईएस कॉलेज वडाळा, किंग्ज सर्कल, सायन आदी काही सखल भागात काही प्रमाणात पाणी साचले. त्यामुळे रस्ते वाहतुकीवर   परिणाम झाला आहे. . दरम्यान, वसई विरार आणि मीरा भाईंदर शहरात बुधवारी रात्रभर पावसाच्या रिमझिम सरी बरसत आहे.  तर अधून मधून जोरदार पाऊस आहे.  आज दुपारनंतर वसई विरार मध्ये पावसाने जोर धरलेला पाहायला मिळाला आहे.  वसई, नालासोपारा आणि विरार मधील सखल भागात पाणी साचण्यास सुरूवात झाली .  यामुळे  पालिकेचा नालेसफाई दावा फोल ठरल्याच दिसून येत आहे. 


दरम्यान, पुढील तीन ते चार दिवसांमध्ये दक्षिण कोकणात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळं येत्या 3 ते 4 दिवसांत कोकणात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्या परिस्थितीत रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांना पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रातही मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोल्हापूर, सातारा आणि सांगली जिल्ह्यातल्या घाटमाथ्यावर उद्या आणि परवा मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.