Eknath Shinde CM: महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्या नावाची घोषणा करून देवेंद्र फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे. या मंत्रिमंडळात देवेंद्र फडणवीस नसणार मात्र, राज्यातील या नव्या सरकारचा रिमोट त्यांच्या हातात असणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. 


शिवसेनेचे बंडखोर आमदारांसह सहकारी घटक पक्ष आणि  भाजप यांच्या युतीचे सरकार आता राज्याचा कारभार हाकणार आहेत. भाजप आणि सहकारी अपक्ष, घटक पक्षांचे 120 आमदारांचे बळ शिवसेनेच्या बंडखोरांना मिळाले आहे. त्यामुळे आता राज्यात नव्या सरकारकडे जवळपास 170 आमदारांचे पाठबळ असणारे सरकार स्थापन होणार आहे. राजभवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, भाजप सत्तेच्या मागे धावणारी नाही. ही लढाई हिंदुत्वाची आहे, तत्वांची आहे, विचारांची आहे. या नव्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असणार आहे. पुन्हा एकदा हिंदुत्वाचे सरकार स्थापन होत असल्याचे त्यांनी म्हटले.


देवेंद्र फडणवीस यांच्या या घोषणेनंतर राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये भाजप आणि अपक्षांचा समावेश असणार आहे. मात्र, देवेंद्र फडणवीस हे या मंत्रिमंडळात सहभागी असणार नाहीत. त्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांनी सरकारच्या पाठिशी उभे राहणार असल्याचे जाहीर केले आहेत. 


मंत्रिमंडळात भाजपचा वरचष्मा?


सत्तावाटपाचे सूत्र अद्याप जाहीर झाले नाही. एकनाथ शिंदे यांचाच शपथविधी कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर काही दिवसांनी  इतर मंत्र्यांचा शपथविधी होणार आहे. या सरकारमध्ये सर्वाधिक आमदार भाजप आणि मित्र पक्षाचे आहेत. त्यामुळे भाजपच्या मंत्र्यांची संख्या अधिक असणार आहे. 


सत्तेचा रिमोट देवेंद्र यांच्याकडे?


देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सत्तेचा रिमोट असणार असल्याचे म्हटले जात आहे. भाजपचे मंत्रिमंडळावर असलेले वर्चस्व आणि देवेंद्र यांचा मुख्यमंत्री म्हणून काम केल्याचा अनुभव याआधारे राज्य सरकारचा रिमोट त्यांच्या हाती असणार आहे. त्यामुळे अनेक महत्त्वाच्या प्रश्नांवर, मुद्यांवर देवेंद्र फडणवीस यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.