Mumbai-Pune Express Way : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर मार्गांवरील (Mumbai-Pune Express Way update ) वाहतूक सुमारे नऊ तासांनी सुरळीत झाली आहे.  मुंबई आणि पुण्याकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.  केमिकलचा टँकर पलटल्याने एक्स्प्रेस वेवर नऊ तासांपासून मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. नऊ तासानंतर धीम्यागतीने वाहतूक सुरु झाल्याने वाहन चालकांना  थोडा दिलासा मिळाला  आहे. काही तासांतच  मुंबई-पुणे एक्सप्रेस वे पूर्ण खुला होणार आहे. 


पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर एका टँकरमधील केमिकलचा टँकर पलटल्याने रस्त्यावर केमिकल सांडले लागले. यामुळं अनेक वाहन घसरू लागली. दोन अवजड वाहन तर पलटी झाली. पहाटे 5:30 च्या सुमारास बोरघाटामध्ये ही घटना घडली. त्यामुळे मार्गावरील वाहतूक विस्कळीत झालेली आहे. मुंबईकडे जाणारी वाहतूक तर जवळपास ठप्प झाली होती.  पुण्याकडे जाणारी वाहतूक धीम्या गतीने सुरु आहे.  यंत्रणेकडून केमिकल आणि अपघातग्रस्त वाहन हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे. 


मुंबईची वाहतूक पुण्याच्या मार्गावर


 पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर केमिकल पसरल्याने ही परिस्थिती उद्भवली आहे. सकाळी सहापासून मुंबईकडे जाणारी सर्व वाहतूक जुना पुणे-मुंबई महामार्गाकडे वळवली आहे. त्यामुळे सर्व ताण एकाच मार्गावर आला, त्यामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी झालीये. आता वाहन चालक आणि प्रवाशांची सहनशीलता संपल्याने त्यांनी पुण्याच्या मार्गावरून मुंबईची वाट धरली आहे. 


पुणे-मुंबई मार्गावरील वाहतूक कोंडीत टोल चालकांकडून लूट


वाहतूक कोंडीचा फायदा घेत टोल चालकांकडून पैसे लाटले जात आहेत. ओला-उबेर चालकाने हे वास्तव व्हिडीओद्वारे समोर आणले आहे. पुणे-मुंबई एक्सप्रेस-वे वर टोल दिला असताना, जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर ही सक्तीने टोल वसूल केला जातोय, असा आरोप या चालकाने व्हिडिओत केलाय. गेल्या सहा तासंपासून प्रवासी ताटकळत आहेत. हे सर्व प्रवासी पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील 270 रुपयांचं टोल देऊन येथे पोहचलेत. मात्र पर्यायी मार्गावर आणखी टोल नाका आडवा आला आहे. सगळे प्रवासी वाहतूक कोंडीच्या संकटात फसले असताना इथे पुन्हा टोल आकारला जातोय. त्यामुळेच संतप्त झालेल्या ओला-उबेर चालकाने एक व्हिडीओ बनवला आणि टोल चालक संकटसमयी लूट करतायेत असा आरोप देखील केला.