Mumbai News : मतदारांची (Voter ID) ओळख प्रस्थापित करून मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करणे, तसेच एकापेक्षा जास्त मतदार संघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदार संघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखली जावी, यासाठी मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड (Aadhar Card) संलग्न करण्यासाठी दिनांक 1 ऑगस्ट 2022 पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे, अशी माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली.


मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी विशेष मोहीम


या विशेष मोहिमेत मतदान ओळखपत्रासोबत आधार क्रमांक संलग्न करण्यासाठी नमुना अर्ज क्र. 6 ब तयार करण्यात आला आहे. हा अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. तसेच मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल. त्याचबरोबर मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्र 6ब व्दारे आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी निवतकर यांनी सांगितले.


11 पर्यायापैंकी कोणताही एक पुरावा


मतदाराकडे आधार क्रमांक नसल्यास नमुना क्र. 6 ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना मनरेगा जॉब कार्ड, फोटोसहित किसान पासबुक, आरोग्य स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI द्वारा दिले गेलेले स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, फोटोसहित पेन्शन कागदपत्रे, केंद्र / राज्य शासन कर्मचाऱ्याचे ओळखपत्र, आमदार / खासदार यांना दिलेले ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र या 11 पर्यायापैंकी कोणताही एक दस्तावेज सादर करता येईल. अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांकडून देण्यात आली. मतदान ओळखपत्राशी आधार क्रमांक संलग्न करण्याच्या या विशेष मोहिमेत मुंबई शहर जिल्ह्यातील जास्तीजास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, असेही आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी निवतकर यांनी केले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


Todays Headline 20th July : आज दिवसभरात घडणाऱ्या राष्ट्रीय आणि स्थानिक महत्त्वाच्या बातम्या


Mumbai : कॅबिनेट मंत्रीपद मिळवून देण्यासाठी आमदारांकडे 100 कोटी रुपयांची मागणी, 4 जणांना अटक, गुन्हे शाखेची कारवाई 


Maharashtra : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना कोकणातील रिफायनरी विरोधकांचे पत्र; "कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्यास जबाबदारी तुमची''