Nawab Malil in Ed office : राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची ईडीकडून चौकशी करण्यात येत आहे. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी ईडी आणि केंद्रीय तपास यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. ईडीच्या कोठडीत असलेला दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरने नवाब मलिक यांचे नाव घेतले असल्याचे समोर आले. त्यानंतर ईडीचे पथक नवाब मलिक यांच्या घरी दाखल झाले. 


नवाब मलिक यांची चौकशी ज्यासाठी ईडीनं सुरु केलीय ते प्रकरण दाऊद इब्राहिम आणि त्याचा भाऊ इक्बाल कासकर याच्याशी संबंधित असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गँगस्टर दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर याला ईडीनं याआधीच ताब्यात घेतलं आहे. या चौकशीत त्याच्याकडून महत्त्वाची माहिती हाती लागली. नवाब मलिक यांच्या भावाला काल ईडीने समन्स पाठवल होत. त्यानंतर आज पहाटे नवाब मलिक यांच्या कुर्ला या निवासस्थानी ईडीचे अधिकारी ५.३० ते ६ वाजताच्या दरम्यान पोहचले. त्यानंतर नवाब मलिक यांनी ईडी कार्यालयात स्वत: हून येण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर सकाळी 7 ते 7.30 वाजण्याच्या सुमारास नवाब मलिक हे ईडी अधिकाऱ्यांसोबत घरातून निघाले. 


प्रकरण काय?


मुंबईत आणि लगतच्या परिसरात ईडीनं काही दिवसांपूर्वी छापेमारी केली होती. ईडीच्या रडारवर डॉन दाऊद इब्राहीमची मुंबईतली मालमत्ता आणि त्या संपत्तीशी निगडीत व्यवहार करणारे काही नेतेमंडळी ईडीच्या रडारवर होते. केंद्रीय गृहमंत्रालयाच्या आदेशानंतर ईडीने ही कारवाई सुरू केली. या छापेमारीनंतर काही नेते अडचणीत येऊ शकतात याची दबक्या आवाजात चर्चा सुरु होती.


दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकरला ईडी कोठडी


अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकरला शुक्रवारी सात दिवसांची ईडी कोठडी सुनावण्यात आली. अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याच्या जवळील लोकांविरोधात मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास सुरु आहे. याप्रकरणी ईडीने इक्बाल कासकरला अटक केली होती. शुक्रवारी इक्बाल कासकरला विशेष मुंबईतील विशेष पीएमएलए  कोर्टात हजर केलं होतं. यावेळी कोर्टाने इक्बाल कासकरला सात दिवसांची ईडी कोठडी सुनावली आहे.


अंडरवर्ल्ड अजूनही भारतात सक्रिय, ईडीच्या सूत्रांची माहिती


दाऊद इब्राहिम मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात ईडीने आतापर्यंत 6 जणांचे जबाब नोंदवले आहेत. याच प्रकरणी ईडीने 2 बिल्डरांना समन्स पाठवले असून, त्यांचे जबाबही नोंदवले जाणार आहे. ईडीच्या सूत्रांनी एबीपी न्यूजला माहिती दिली की, या संपूर्ण मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात आरोपींनी डिजिटल वॉलेट आणि डार्कनेटचा वापर करून पैसे इकडे तिकडे ट्रान्सफर केले आहेत. या संपूर्ण प्रणालीचा वापर 2019 च्या सुमारास सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. युएईतील काही एजन्सींमार्फत हा पैसा रिअल इस्टेटमध्ये गुंतवण्यात आल्याचेही सूत्रांनी सांगितले. खंडणी, ड्रग्ज, रिअल इस्टेट आणि सट्टेबाजीमध्ये अंडरवर्ल्ड अजूनही भारतात सक्रिय असल्याचे ईडीच्या सूत्रांनी सांगितले.