Election Duty : मुंबईतील (Mumbai) प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बीएलओ (BLO) ड्युटीतून वगळून, अन्य कर्मचाऱ्यांना बीएलओ ड्युटी देण्याबाबतचे स्पष्ट आदेश मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांनी दिले आहेत. या संदर्भातील माहिती शिक्षक भारती संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष किसन मोरे यांनी दिली.


मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांचे पत्र


'परीक्षा कालावधी असल्याने बीएलओ ड्युटीसाठी नियमित कार्यरत शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना घेतल्यास शाळा चालवणे अवघड जाईल, तसेच प्रात्यक्षिक परीक्षा, तोंडी परीक्षा, दहावी बारावीच्या लेखी परीक्षा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना वगळण्याची मागणी आमदार कपिल पाटील आणि शिक्षक भारती संघटनेने मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे यांना केली होती. त्यानुसार मुख्य निवडणूक अधिकारी यांनी पत्र पाठवून शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना ड्युटीतून वगळण्याचे आदेश दिले आहेत.


 



 


इलेक्शन ड्युटी लावल्याने शिक्षकांमध्ये प्रचंड रोष


मुंबईतील शिक्षकांना इलेक्शन ड्युटी लावल्याने कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड रोष पाहायला मिळाला होता. परीक्षांच्या काळात अशैक्षणिक कामं दिली जात असून, मुंबईतील जवळपास 1000 शिक्षकांना ऐन परीक्षेच्या काळातच 'इलेक्शन ड्युटी लावण्यात आल्याने शिक्षकांनी याचा विरोधही केला होता. अशाप्रकारे कामं लावणं हे शिक्षण हक्क कायद्याचे उल्लंघन असल्याचं शिक्षक संघटनांनी म्हटलं होतं.


 


शिस्तभंगाची कारवाई


जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी यासंदर्भात तातडीची नोटीस पाठवून शिक्षकांना रुजू होण्याचे आदेश दिले होते. यामध्ये मुंबईतील जवळपास एक हजार शिक्षकांनाही इलेक्शन ड्युटी लावण्यात आली होती, तसेच या आदेशाचे पालन न केल्यास शिस्तभंगाची कारवाई या शिक्षकांवर केली जाणार असल्याचे आदेश होते. त्यामुळे त्या कामाविरोधात शिक्षक संघटना आक्रमक झाल्या होत्या, तसेच हे परिपत्रक मागे घेऊन हे आदेश रद्द करण्याची मागणी करण्यात आली होती. तसेच अनेक शाळांमधील जवळपास 50 टक्के शिक्षकांना या कामासाठी पाचारण करण्यात आल्याने शिक्षक वर्गात प्रचंड नाराजी पाहायला मिळत होती. 


 


मनसेचीही आक्रमक भूमिका


शिक्षकांना निवडणुकीच्या कामात ड्युटी लावण्यासंदर्भात मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी देखील आक्रमक भूमिका घेतली होती. शिक्षकांना निवडणूकीच्या कामासाठी कशासाठी घेता? ते या कामासाठी आहेत का? निवडणूक आयोग पाच वर्षे काय करत असतो, असे प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केले होते. याबाबत मनसे नेते अमित ठाकरेंनी निवडणूक आयोगाला निवेदन देखील दिले होते. ज्यात आयोगाला पर्याय देखील सूचवण्यात आले होते.