मुंबई: राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षातील जुनेजाणते नेते अशी ओळख असणाऱ्या मनोहर जोशी यांचे शुक्रवारी पहाटे मुंबईत निधन झाले. हृदयविकाराचा झटका आल्याने मनोहर जोशी (Manohar Joshi) यांना गुरुवारी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यानंतर मनोहर जोशी यांची प्रकृती सातत्याने खालावत गेली आणि शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मनोहर जोशी यांच्या जाण्याने (Manohar Joshi Passed Away) शिवसेना पक्षाचा सुवर्णकाळ पाहिलेला आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत घडलेला नेता काळाच्या पडद्याआड गेला आहे. मनोहर जोशी यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत मुंबईचे महापौरपद, राज्याचे मुख्यमंत्रीपद आणि लोकसभेचे अध्यक्ष अशी प्रतिष्ठित पदे भुषविली होती. 


मनोहर जोशींना मुख्यमंत्रीपद का सोडावे लागले?


राज्यात पहिल्यांदाच शिवसेना-भाजप युतीचे सरकार आल्यानंतर मनोहर जोशी यांना मुख्यमंत्री होण्याचा मान मिळाला होता. 1995 शिवाजी पार्कवर झालेल्या शपथविधीत राज्यपाल पी. सी. अलेक्झांडर यांनी मनोहर जोशी यांना मुख्यमंत्रिपदाची शपथ दिली होती. यानंतर मनोहर जोशी यांची मुख्यमंत्रीपदाची कारकीर्द ऐन भरात असताना १९९९ साली मनोहर जोशी यांच्यावर मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडण्याची वेळ आली होती. मनोहर जोशी यांचे जावई गिरीश व्यास यांच्यासाठी पुण्यातील एका शाळेसाठी राखून ठेवण्यात आलेल्या भूखंडाचे आरक्षण बदलण्यात आल्याचा आरोप झाला होता. हेच मनोहर जोशी यांच्या मुख्यमंत्रीपदावरुन गच्छंतीचे निमित्त ठरले. 


मातोश्रीवरुन बाळासाहेब ठाकरेंचा एक आदेश येताच जोशी सरांनी मुख्यमंत्रीपद सोडलं


मनोहर जोशी यांचे मुख्यमंत्रीपद गेले तेव्हाचा किस्सा राजकीय वर्तुळात चर्चेचा ठरला होता. जोशी यांच्यावर मुख्यमंत्रीपद सोडण्याची वेळ आली तेव्हा त्यांनी कोणतीही खळखळ न करता बाळासाहेब ठाकरे यांच्या एका पत्रावर आपले पद सोडून दिले. तु्म्ही आता जेथेही असाल तेथे, कृपया सर्वकाही थांबवा. महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे राजीनामा सुपूर्द करुन मला भेटायला या, असा मोघम मजकूर या पत्रात लिहला होता. मातोश्रीवरुन आलेला हा आदेश वाचल्यानंतर मनोहर जोशी यांनी तात्काळ राज्यपालांकडे आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता.


मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिल्यानंतर मनोहर जोशी काय म्हणाले?


मनोहर जोशी यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा आदेश शिरसावंद्य मानून आपले मुख्यमंत्रीपद एका क्षणात सोडले होते. यानंतरही त्यांच्या मनात बाळासाहेब ठाकरे यांच्याविषयी कोणतेही किल्मिष नव्हते. मुख्यमंत्रीपद गेल्याबद्दल त्यांना नंतरच्या काळात प्रतिक्रिया विचारण्यात आली तेव्हा त्यांनी म्हटले की, 1999 साली एका गैरसमजातून मुख्यमंत्रीपद गेले. जो पद देतो त्याला ते काढण्याचा अधिकार आहे. बाळासाहेबांनी ज्यावेळी मला मुख्यमंत्री केले तेव्हा का केले असे विचारले नाही. त्यामुळे राजीनामा देण्याचे आदेश त्यांनी दिले तेव्हा तात्काळ राजीनामा दिला. 1995 साली मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी मी आणि सुधीर जोशी दोघेही बाळासाहेबांना भेटलो होतो. साहेबांनी मला पसंती दिली. प्रेयसीला आपण विचारतो का, माझ्यावरच का प्रेम केले? बाळासाहेबांचे माझ्यावर नितांत प्रेम होते म्हणूनच शिवसेनेतील सर्व पदे मला मिळाल्याचे मनोहर जोशी यांनी सांगितले होते.


आणखी वाचा


कडवट शिवसैनिक, नगरसेवक ते मुख्यमंत्री! मनोहर जोशींचा धगधगता राजकीय प्रवास!