Maharashtra Legislative Council : राज्यात येत्या काही महिन्यात विधान परिषदेच्या 10 जागा रिक्त होत आहेत. विधान परिषदेच्या या 10 जागांसाठी निवडणुका होणार आहेत. या जागांमुळे नेत्यांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. विधान परिषदेच्या आमदारकीसाठी इच्छुक असणाऱ्यांनी आतापासूनच लाँबिंगला सुरुवात केली आहे.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होऊन जवळपास अडीच वर्ष पूर्ण झाले आहेत. या कालावधीत महामंडळाच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. तर, महापालिका निवडणुकांबाबतही अद्याप कोणतीही स्पष्टता नाही. त्यामुळे अनेकांनी विधान परिषदेसाठी प्रयत्न सुरू केले आहेत. अवघ्या काही जागांसाठी डझनभर नेते इच्छुक आहेत.
विधान परिषदेच्या आमदार निवडणुकीचे गणित काय?
येत्या जुलै महिन्यात विधानपरिषदेच्या 10 जागा रिक्त होत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेची एक जागा रिक्त होत आहे. या जागेसाठी भाजप आणि शिवसेनेत निवडणुक होऊ शकते. विधानपरिषदेवर सध्या भाजपचे 5, शिवसेनेचे 2, राष्ट्रवादीचे 2 आणि काँग्रेसचे 1 सदस्य आहेत.
विधानपरिषदेच्या एका सदस्य निवडीसाठी 27 मतांची गरज असते. विजयाच्या सुरक्षित मतांसाठी हा आकडा 29 मतांचा पकडला जातो. विधान परिषदेतील 27 मतांप्रमाणे बलाबल लक्षात घेता भाजपच्या 4, शिवसेनेच्या 2, राष्ट्रवादी काँग्रेसला 2 आणि काँग्रेसला एका जागेवर विजय मिळू शकतो. तर, उरलेल्या एका जागेसाठी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये चुरस रंगण्याची शक्यता आहे.
कोणाला संधी मिळणार?
विधान परिषदेतील दहा जागांसाठी सर्वच पक्षात चढाओढ सुरु झाली आहे. वरिष्ठासोबत नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचं मोठं आव्हान पक्षश्रेष्ठींवर आहे. त्याशिवाय महाविकास आघाडीतल्या अनेक दिग्गजांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे.
शिवसेनेत अनेक नेत्यांना परिषदेचं गाजर दाखवण्यात आल्याची चर्चा आहे. त्यामुळे शिवसेनेने सुभाष देसाईंना पुन्हा संधी देणार का मिलिंद नार्वेकर यांना आमदारकी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. त्याशिवाय सचिन अहिरांसारख्या चेहऱ्यांना संधी देऊन शिवसेना शब्द पाळणार का, याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. अशीच काहीशी परिस्थिती भाजप आणि राष्ट्रवादीतही दिसून येत आहे. प्रवीण दरेकर हे विरोधी पक्षनेते आहेत. तर रामराजे निंबाळकर सभापती आहेत. या दोन्ही पक्षात अनेक नवे चेहरे विधान परिषदेच्या तिकिटासाठी रांगेत उभे असून दावा करत आहेत.
या आमदारांची मुदत संपली
विधान परिषदेचा कार्यकाळ पूर्ण केलेल्या किती आमदारांना पुन्हा संधी मिळणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे. विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर, सदाभाऊ खोत, सुजितसिंह ठाकूर, विनायक मेटे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, संजय दौंड आदी सदस्यांचा कार्यकाळ संपला आहे.