मुंबई : 24 ऑक्टोबरला होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परिक्षेचे हॉल तिकीट (Maharashtra Health dept Exam Update )उमेदवारांना मिळायला सुरवात झाली आहे. मात्र या परीक्षेसंदर्भातील सावळागोंधळ थांबायचं नाव घेत नाहीय. हॉल तिकीटच्या सेंटरवरुन पुन्हा गोंधळ झाला आहे. एकाच दिवशी दोन परीक्षेसाठी दोन वेगळ्या जिल्ह्यात परीक्षा केंद्र आल्याने काही विद्यार्थी संभ्रमात पडले आहेत. 



Maharashtra Health dept Exam Update : मागील आठवड्यात होणारी आरोग्य विभागाची परीक्षा ऐनवेळी परीक्षेचे नियोजन होऊ न शकल्याने पुढे ढकलण्यात आली होती आणि या परीक्षेची तारीख 24 ऑक्टोबर आणि 31 ऑक्टोबर जाहीर करण्यात आली. 24 ऑक्‍टोबरला होणाऱ्या आरोग्य विभागाच्या परीक्षेचे हॉल तिकीट ऑनलाइन पद्धतीने उमेदवारांना प्राप्त होत आहेत. 


Health Dept Exam Date: आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर; 24 आणि 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा


यातील काही हॉल तिकीटमध्ये ज्या उमेदवारांनी दोन वेगळ्या पदांच्या परीक्षेसाठी अर्ज केले आहेत. या उमेदवारांचे परीक्षेचे दोन पेपर एकाच दिवशी असून दोन परीक्षेचे केंद्र मात्र दोन वेगळ्या जिल्ह्यात आहेत. शिवाय एक सकाळचा परीक्षेचा पेपर सकाळी 10 ते  दुपारी 12 दरम्यान तर दुपारचा सेशनचा दुसऱ्या पदासाठीचा पेपर दुपारी 3 ते 5 या दरम्यान आहे. 



त्यामध्ये उमेदवारांनी दोन पेपर देण्यासाठी मधल्या दोन ते तीन तासात दोन जिल्ह्यांमध्ये दीडशे दोनशे किलोमीटर अंतर पार करणे शक्य नसल्याने हे पेपर एकाच दिवशी कसे द्यायचे असा प्रश्न उमेदवारांना पडला आहे? तर काही उमेदवारांनी अर्ज भरताना पर्याय म्हणून जवळचे जिल्ह्यातील केंद्र मिळावे असे नमूद केले असतानासुद्धा दूरच्या जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्र मिळाले आहे.


आरोग्य विभागाच्या वर्ग क पदासाठी 24 ऑक्टोबरला तर वर्ग ड साठी 31 ऑक्टोबर रोजी परीक्षा होणार आहे.  दरम्यान, यापूर्वी परीक्षा आदल्या दिवशी रात्री अचानक स्थगित करण्यात आली होती. यामुळं अनेक विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला होता.  ऐन वेळी आरोग्य विभागाच्या परीक्षा रद्द झाल्यामुळं परीक्षा केंद्रावरती पोहोचलेल्या लाखो उमेदवारांना मनस्ताप आणि आर्थिक फटका सहन करावा लागला होता.  त्यामुळे लवकरात लवकर यातील अडचण दूर करून उमेदवारांना एकाच ठिकाणी ज्या ठिकाणी पर्यायी केंद्र म्हणून अर्ज भरताना निवडले गेले होते अशा ठिकाणी केंद्र द्यावे अशी मागणी उमेदवारांनी आरोग्य विभागाकडे केली आहे.