मुंबई : 'प्रबोधनमधील प्रबोधनकार' या ग्रंथाचे उद्या प्रकाशन होत आहे. याच प्रकाशनाच्या कार्यक्रमात प्रबोधनकारांच्या विचारांचा वारसा आणि व्यासंग असलेले प्रबोधनकार ठाकरे यांचे नातू अर्थात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना सुद्धा राजशिष्टाचारनुसार बोलवावे, असे पत्र भाजप आमदार आशिष शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिले आहे. मात्र, अचानक आशिष शेलार यांनी या कार्यक्रमला राज ठाकरे यांना निमंत्रित करण्याबाबत थेट मुख्यमंत्री यांना विनंती केल्याने अनेकांच्या भुवय्या उंचवल्यात.


उद्या मराठी भाषा विभागातर्फे वाचन प्रेरणा दिनानिमित्त कार्यक्रम तसेच प्रबोधन नियतकालिकातील प्रबोधनकार ठाकरे यांच्या लेखांच्या संग्रह ग्रंथाचे प्रकाशन आणि स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारकाच्या संकेतस्थळाचे लोकार्पण असे दोन महत्वाचे कार्यक्रम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सहयाद्री अतिथीगृह येथे पार पडणार आहे. यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्रिमंडळातील मंत्री बाळासाहेब थोरात, सुभाष देसाई, अस्लम शेख, विश्वजित कदम, खासदार अरविंद सावंत, भाजप आमदार मंगल प्रभात लोढा यांना आज सामनामध्ये छापून आलेल्या निमंत्रण पत्रिकेत स्थान आहे. मात्र, राज ठाकरे यांचं नाव यामध्ये नाही.


ही कार्यक्रम पत्रिका पाहिल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे  यांचे नाव न दिसल्याने भाजप आमदार आशिष शेलार यांनी राज ठाकरे यांना राजशिष्टाचारानुसार निमंत्रण द्यावे अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लिहून विनंती केली. आणि उद्धव ठाकरे यांच्यासोबत राज ठाकरे सुद्धा जर कर्यक्रमला व्यासपीठावर असतील तर एक संस्मरणीय सोहळा महाराष्ट्र बघेल असे सुद्धा शेलार पत्रात म्हणाले.


राज ठाकरे आणि आशिष शेलार यांची मैत्री सर्वश्रोत आहे. त्यात भाजप मनसे जवळीक वाढतानाच्या चर्चेत आपल्या मित्रासाठी खास शेलार यांनी मुख्यमंत्र्यांना लिहलेले हे पत्र भुवय्या उंचवणारे आहे. या पत्रात आशिष शेलार लिहितात, '‘प्रबोधनमधील प्रबोधनकार’ या ग्रंथ प्रकल्पाबद्दल सरकारचं अभिनंदन करतो. मात्र, या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेत्यांना बोलावलं असतं तर अधिक आनंद झाला असता. याच बरोबर प्रबोधनकारांच्या विचारांचा व्यासंग आणि वारसा असणारे राज ठाकरे यांनाही या कार्यक्रमाला बोलावून एक चांगला संदेश देता आला असता अर्थात देता येऊ शकतो. अर्थात ते आमंत्रण स्वीकारतील की नाही हा सर्वस्वी त्यांचा निर्णय राहील' 


जानेवारी महिन्यात दक्षिण मुंबईत बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या कार्यक्रमावेळी हा कार्यक्रम शासकीय असतानासुद्धा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना या कार्यक्रमासाठी खास आमंत्रण होतं आणि याच कार्यक्रमावेळी उद्धव आणि राज ठाकरे हे एका व्यासपीठावर महाराष्ट्राने पाहिले होते. त्यामुळे आता मुख्यमंत्र्यांना अशिष शेलार यांनी लिहिलेल्या विनंती पत्रानंतर उद्या होणाऱ्या कार्यक्रमाला राज ठाकरे यांना आमंत्रण दिले जाणार का आणि ते या कार्यक्रमाला उपस्थित राहणार का? पुन्हा एकदा राज आणि उद्धव ठाकरे एकत्र व्यवसपीठावर महाराष्ट्र पाहणार का ? हे पाहावे लागेल.