मुंबई : एकीकडे लॉकडाऊनमध्ये सर्वसामन्यांचा रोजगार गेल्यामुळे नागरिक हैराण आहेत. मात्र अशा प्रतिकूल परिस्थितीतही सामान्य नागरिक आपापल्या पद्धतीने गरजूंना मदतीचा हात देत आहेत. मुंबई उपनगरातील घाटकोपरमधील एक शिक्षक सध्या कोरोनाग्रस्तांसाठी अनोखी मदत करत आहे. 


दत्तात्रत सावंत खरंतर पेशाने शिक्षक, इंग्रजी शिकवतात. मात्र विनाअनुदानित शाळेत शिकवत असल्याने आणि सध्या लॉकडाऊन लागल्याने ते आता रिक्षा चालवतात. मात्र हे काम करतानाही त्यांनी अनोखं मदतकार्य सुरु केलं आहे. ते सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांना कोविड सेंटर तसंच रुग्णालयापर्यंत मोफत सोडत आहेत. याशिवाय रुग्णालय, कोविड सेंटरमधून डिस्चार्ज मिळालेल्या रुग्णांना मोफत घरी सोडून येत आहेत. यासाठी ते स्वतः सुरक्षेचे सगळे उपाय देखील करत आहेत. 


सध्या कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत अनेक रुग्णांना रुग्णवाहिका मिळत नाही. यात अनेकांचे वेळेत उपचार न मिळाल्याने जीव देखील जात आहेत. त्यामुळे गोरगरीब रुग्णांना वेळेत मदत मिळेल की नाही याची खात्री नसते. खाजगी रुग्णवाहिका परवडत नाही आणि अनेकदा सार्वजनिक वाहने कोरोनाग्रस्त रुग्णांना सेवा देत नाहीत. अशा वेळी दत्तात्रय सावंत हे मात्र या रुग्णांच्या लोकांच्या मदतीला धावून जात असून त्यांना मोफत सेवा देत आहेत.


कोरोना महामारीच्या या कठीण काळात दत्तात्रय सावंत हे शिक्षक आपली समाजाप्रतीची बांधिलकी जपताना दिसत आहेत. त्यांचा आदर्श खरंच समाजाने घेणं गरजेचं आहे.


कल्याणमधील चार रिक्षाचालकांची समाजसेवा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेल्या घटकांची उपासमार झाली आहे. मात्र तरीही काही जण सामाजिक बांधिलकी जपत आहेत. कल्याणमधील चार रिक्षाचालकांनी एकत्र येत आपत्कालीन सेवेतील पोलीस, रुग्णालयीन कर्मचारी, डॉक्टर यांना मोफत रिक्षा सेवा सुरु केली आहे. हसन सय्यद, फारुख शेख, इरफान शेख आणि युनूस शेख अशी या रिक्षा चालकांची नावं आहेत. आपल्या रिक्षाच्या मागे त्यांनी आपला मोबाईल क्रमांक प्रसिद्ध करत आपत्कालीन कर्मचाऱ्यांना आवाहन केलं आहे. इतकंच नव्हे तर रुग्णांना देखील रुग्णालयापर्यंत मोफत सेवाही हे चौघे देत आहेत. कोरोना काळात आपत्कालीन सेवेतील कर्मचारी स्वतःचा जीव धोक्यात घालून नागरिकांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपणही सामाजिक भान जपत आपल्यापरीने समाजसेवा करावी, या उद्देशाने हे चौघेजण एकत्र आले असून कोणताही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता त्याचे समाजकार्य विनाखंड सुरु आहे.