मुंबई :  राज्य सरकारनं अर्थसंकल्पात जाहीर केल्याप्रमाणं "मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण" या योजनेनुसार पात्र लाभार्थी महिलांच्या खात्यात जुलै आणि ऑगस्ट या दोन महिन्यांचे 3 हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या योजनेला यशस्वी करण्यासाठी प्रशासकीय पातळीवर देखील प्रयत्न करण्यात आले. राज्य सरकारकडून 17 ऑगस्टला पुण्यात लाडकी बहीण योजनेच्या शुभारंभासाठी मोठा सोहळा आयोजित करण्यात येणार आहे. त्यापूर्वी राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसीठी मोठा निर्णय घेतला आहे. राज्य सरकारनं या योजनेच्या प्रसिद्धीसाठी 199 कोटी रुपयांच्या खर्चाला मान्यता दिली आहे.  


राज्य शासनाच्या महिला व बालकल्याण विभागाकडून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी  माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत माध्यम आराखडा राबविण्यास (Media Plan) व त्याकरिता होणा-या रुपये 199 कोटी 81 लाख 47 हजार 436 रुपयांच्या  खर्चास शासन मान्यता देण्यात आल्याचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. 


लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी नमूद माध्यम आराखड्यानुसार जाहिरात प्रसिध्दीची कार्यवाही माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयाने महिला व बाल विकास विभागाच्या यंत्रणेच्या समन्वयानं करायची आहे. 
          
लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी माहितीपट, अॅनिमेशन फिल्म, व्हिडिओ थीम साँग, ऑडिओ साँग, जिंगल्स, स्पॉट तयार करण्यात येणार आहेत. या सर्वांची प्रसिद्धी वर्तमानपत्रे, दूरदर्शन, आकाशवाणी केंद्र, वाहिन्या, एफएम रेडिओ,कम्युनिटी रेडिओ, स्थानिक लोकल केबल  सिनेमागृह, मुंबई लोकल, एसटी बसेस, आणि रेल्वे स्थानकांवर देखील केली जाणार आहे. चर्चासत्रांचं आयोजन दखील केलं जाणार आहे. बेस्ट बसेस, एसटी डेपोतील स्क्रीन, पीएमपी, सोशल मिडिया आणि डिजीटल मिडिया, ओटीटी माध्यमांवर देखील जाहिरात केली जाणार आहे.


राज्य सरकारची महत्त्वकांक्षी योजना


राज्य सरकारनं मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना सुरु केली असून पात्र महिलेला दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. या योजनेद्वारे ज्या महिलांच्या कुटुंबांचं उत्पन्न अडीच लाखांपेक्षा कमी असेल त्यांना दरमहा 1500 रुपये मिळणार आहेत. महिलांना या योजनेतून एका वर्षाला 18 हजार रुपये मिळणार आहेत. लाडकी बहीण योजनेबाबत आमदार रवी राणा आणि आमदार महेश शिंदे यांनी केलेल्या वकत्व्यांमुळं विरोधी पक्षांनी हल्लाबोल केला होता.  रवी राणा यांनी लाडक्या बहिणींनी आशीर्वाद दिले नाहीत तर 1500 रुपये मागे घेण्याबाबत वक्तव्य केलं होतं.


संबंधित बातम्या :


Ladaki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेच्या प्रसिद्धीसाठी 199 कोटींचा खर्च, मतांसाठी महाराष्ट्र विकायला पण कमी करणार नाहीत, वडेट्टीवारांनी जीआर ट्वीट करत आकडेवारी मांडली


अरे वेड्यांनो, भाऊबीज कधीही परत घेतली जात नाही; देवेंद्र फडणवीसांचा महेश शिंदे, रवी राणांना टोला?