मुंबई : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण म्हणजेच म्हाडानं काही दिवसांपूर्वी मुंबईतील 2030  घरांसाठी सोडत (Mhada Lottery 2024) जाहीर केली आहे. या सोडतीसाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज मागवण्यात आले आहेत. मुंबईत घर घेण्याचं अनेकांचं स्वप्न असतं त्यामुळं लाखो मुंबईकर  म्हाडाच्या लॉटरीची वाट पाहत असतात. म्हाडानं मुंबईतील विविध भागातील घरांसाठी ऑनलाईन सोडत जाहीर केली आहे. मुंबईकरांनी म्हाडाच्या अधिकृत वेबसाईटवर अर्ज दाखल करण्यासाठी https://housing.mhada.gov.in या वेबसाईटवर नोंदणी प्रक्रिया सुरु केलेली असताना अज्ञात व्यक्तींनी म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत वेबसाईटच्या नावासारखी एक बनावट वेबसाईट सुरु केली होती. हे म्हाडाच्या लक्षात येताच सायबर पोलिसांकडे तक्रार करण्यात आली होती. या तक्रारीनंतर बीकेसी सायबर पोलिसांनी बनावट वेबसाईट लॉक केली आहे.

  


म्हाडाच्या घरांसाठी नोंदणी सुरु केल्यानंतर काही अज्ञात व्यक्तींनी म्हाडाच्या https://mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळासारखे दिसणारे हुबेहूब बनावट अनधिकृत संकेतस्थळ mhada.org या नावे तयार केले आहे. बनावट संकेतस्थळाचे होम पेज, पत्ता व पहिल्या पानावरील संकेतस्थळाची रचना म्हाडाच्या अधिकृत संकेतस्थळासारखीच आहे. मात्र, या बनावट संकेतस्थळावर अर्ज प्रक्रिया न राबविता थेट पेमेंटचा पर्याय उपलब्ध करून दिला आहे.  म्हाडाचे घर  मिळवून देण्याचे आश्वासन देत सदर अज्ञात व्यक्तींनी फसवणूक झालेल्या व्यक्तीस बनावट संकेतस्थळ  व त्यावरील उपलब्ध पेमेंट लिंकबाबत माहिती दिली व त्यांनी म्हाडाच्या प्रकल्पातील सदनिकेच्या एकूण विक्री किंमतीपैकी रु. 50,000 इतकी रक्कम या बनावट संकेतस्थळावरून दिलेल्या लिंकवरून ऑनलाइन भरून घेण्यात आली. तसेच याच बनावट संकेतस्थळावरून बनावट पावतीही उपलब्ध करून दिल्याचा प्रकार घडला होता. 


बनावट अनधिकृत संकेतस्थळ तयार करुन काही नागरिकांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले असल्याने म्हाडा प्रशासनातर्फे सदर बनावट संकेतस्थळ निर्माण करणार्‍या अज्ञात व्यक्तींविरुद्ध सायबर सेलमध्ये तक्रार दाखल करण्यात आली  होती. म्हाडाच्या तक्रारीनंतर बीकेसी पोलिसांनी बनावट वेबसाईट लॉक केली आहे.


अधिकृत वेबसाईटवर अर्ज करा, म्हाडाचं आवाहन


म्हाडातर्फे नुकतीच मुंबईतील विविध गृहप्रकल्पातील 2030 सदनिकांची सोडत जाहीर करण्यात आली असल्याने, म्हाडाचे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल यांनी राज्यातील इच्छुक अर्जदारांना सावधानतेचा इशारा दिला आहे. सोडत प्रक्रियेत सहभाग घेण्याकरिता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावरून सोडतीसाठी अर्ज नोंदणी करून सोडत प्रक्रियेमध्ये सहभागी व्हावे, असं जयस्वाल म्हणाले. सोडत प्रणालीमध्ये पात्र ठरलेले अर्जदारच संगणकीय सोडतीत सहभाग घेऊ शकतील. अशाप्रकारे संगणकीय  सोडतीच्या माध्यमातूनच म्हाडा सदनिकांचे वितरण केले जाते. याव्यतिरिक्त कोणत्याही प्रकारे म्हाडाच्या सदनिकांचे वितरण केले जाऊ शकत नाही याबाबत नागरिकांनी दक्षता घ्यावी असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले आहे.  


संबंधित बातम्या :


MHADA Lottery Mumbai : म्हाडाच्या मुंबईतील 2030 घरांसाठी लॉटरी; आजपासून अर्ज नोंदणी सुरू, 13 सप्टेंबरला निकाल


म्हाडाच्या घरांसाठी अत्यल्प गटात नेतेमंडळी, अनेकांच्या भुवया उंचावल्या; आरक्षित घरांची संख्या किती?