Maharashtra Din 2022 : कोविड काळ असूनही राज्याने प्रगती आणि विकास यात कुठेही खंड पडू दिला नाही. महाराष्ट्राने देशातले एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्था असलेले पहिले राज्य होण्यासाठी विकासाची पंचसूत्री ठरवली असल्याचे गौरवोद्गार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी काढले. महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 62 व्या वर्धापन दिनानिमित्त येथील छत्रपती शिवाजी महाराज मैदानात आयोजित मुख्य शासकीय समारंभात राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.  


यावेळी राज्याला संबोधित करताना राज्यपाल म्हणाले, कोरोनाच्या तीन लाटांचा नियोजनबद्ध रीतीने सामना करीत असताना महाराष्ट्राने देशात एक उदाहरण निर्माण केले आहे. राज्यातल्या 92 टक्क्यांपेक्षा अधिक प्रौढ लोकसंख्येला लसीचा कमीत कमी एक डोस दिला असून उर्वरित लसीकरण गतीने पूर्ण होत आहे. नीती आयोगाने जाहीर केलेल्या Export Preparedness Index मध्ये महाराष्ट्र राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे याबाबत आनंद व्यक्त करून केंद्र शासनाच्या ‘सुशासन निर्देशांक अहवाल- 2021’ मध्ये महाराष्ट्राने दुसरे स्थान मिळविले असल्याचे त्यांनी सांगितले.


राज्यपाल म्हणाले, इलेक्ट्रिक वाहनांबाबत राज्य शासनाने तयार केलेले धोरण व्यापक आणि सर्वांगिण असून त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत राज्यातील इलेक्ट्रिक वाहनांची नोंदणी 157 टक्क्यांनी वाढली आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंग स्टेशन उभारणाऱ्या नागरिकांना तसेच गृहनिर्माण संस्थांना त्यांच्या मालमत्ता करात सूट देण्याचा महत्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला आहे. शहरे कार्बन न्यूट्रल करण्याच्या अनुषंगाने राज्यातील 43 अमृत शहरे रेस टू झिरोमध्ये सहभागी झाली आहेत.


राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 488 शाळा आदर्श शाळा म्हणून पहिल्या टप्प्यात विकसित करण्यात येणार असल्याचे राज्यपाल म्हणाले. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा लवकरात लवकर देण्यात यावा याकरिता शासन केंद्राकडे पाठपुरावा करीत असून मुंबई येथे मराठी भाषा भवनाचे भूमिपूजन  झाले असल्याचे त्यांनी सांगितले. 


राज्यपाल म्हणाले, ग्रामीण भागात महाआवास योजनेतून पावणेपाच लाख घरे देण्यात आली तसेच जल जीवन मिशनमध्ये 174 पाणीपुरवठा योजना सुरू होत आहेत. 100 कोटी रुपये रकमेचा स्टार्टअप फंड उभारण्यात येत आहे. तर  मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमात होतकरू युवक-युवतींच्या मंजूर प्रकल्पांतून सुमारे 1100 कोटी रूपये गुंतवणूक होत आहे. कोरोना संकटकाळात गरीब आणि गरजूंना शिवभोजन थाळी नि:शुल्क उपलब्ध करुन देण्यात आली. सध्या राज्यात 1 हजार 549 शिवभोजन केंद्रे सुरू असून 9 कोटी 18 लाख इतक्या शिवभोजन थाळ्यांचे वितरण करण्यात आले आहे.


ते म्हणाले, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रूपयांपर्यंत लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या अनुदानाचा लाभ अंदाजे 20 लाख शेतकऱ्यांना होणार आहे. सिंचनासाठी बंदिस्त पाईपलाईनद्वारे वितरण व्यवस्था निर्माण करण्यात येत आहे. विकेल ते पिकेल अभियानात शेतकऱ्यांचे विविध गट स्थापन केले असून त्याचा लाभ शेतकऱ्यांना होत आहे. शेतकऱ्यांसाठी मातोश्री ग्रामसमृद्धी शेत/ पाणंद रस्ते योजना सुरू केली आहे. मनरेगा आणि राज्य रोहयोमधून राबविण्यात येत असलेल्या या योजनेसाठी सुमारे १६ हजार किलोमीटरपेक्षा अधिक लांबीचे पाणंद रस्ते बांधण्यात येत आहेत. राज्यातील निर्यातीत वृद्धी करण्यासाठी राज्याचे स्वतंत्र कृषी निर्यात धोरण तयार करण्यात आले असून 21 पिकांसाठी क्लस्टरनिहाय फॅसिलिटेशन सेल तयार करण्यात आले आहेत.


राज्य शासनाने दिल्ली-मुंबई कॉरीडॉरलगत रायगड जिल्ह्यात २ हजार ५०० एकर क्षेत्रावर बल्क ड्रग पार्कचे नियोजन केले आहे. तसेच औरंगाबाद नजीक बिडकीन येथील ऑरीक स्मार्ट सिटीमध्ये ३५० एकर क्षेत्रावर पायाभूत सुविधांनी युक्त वैद्यकीय उपकरण पार्कचे नियोजन केले आहे. पर्यावरणपूरक नैसर्गिक वायूच्या वापरास प्रोत्साहन देण्याकरिता नैसर्गिक वायूवरील मूल्यवर्धित कराचा दर १३.५ टक्यावरून कमी करून ३ टक्के इतका केला आहे, त्यामुळेही नागरिकांना दिलासा मिळत असल्याचे राज्यपालांनी सांगितले.


परिवहन सुविधांबाबत बोलताना राज्यपाल म्हणाले, रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील ताण कमी व्हावा यासाठी प्रवासी जलवाहतुकीला शासन चालना देत असल्याचे सांगून राज्यपाल म्हणाले, नवी मुंबईतील बेलापूर येथून मुंबई, एलिफंटा, जेएनपीटी या जलमार्गावर वॉटर टॅक्सी सेवा सुरू करण्यात आली आहे. पालघर, ठाणे, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये जेट्टींची कामे सुरू आहेत. विमान वाहतुकीला चालना देण्यासाठी राज्य शासनाने विविध निर्णय घेतले आहेत. सिंधुदूर्ग (चिपी), नांदेड, गोंदिया, जळगाव, कोल्हापूर आणि नाशिक विमानतळावरून विमानसेवा सुरू आहे. शिर्डी विमानतळाचा डिसेंबर २०२१ अखेर दहा लाख प्रवाशांनी वापर केला आहे.


मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक बळकट करण्यासाठी मेट्रो प्रकल्पांच्या कामांना अधिक गती देण्यात आली आहे. मुंबई मेट्रो रेल्वे लाईन 2 अ तसेच मुंबई मेट्रो रेल्वे लाईन ७ चे टप्पे वाहतुकीसाठी सुरू केले आहेत. मेट्रोच्या विविध १४ प्रकल्पांचे काम वेगाने सुरू आहे. मुंबईतील बीडीडी चाळींचा पुनर्विकास प्रकल्प प्रगतिपथावर आहे. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण होत आले असून लवकरच तो वाहतुकीसाठी अंशतः खुला करण्यात येईल. मुंबईतील सागरी किनारा प्रकल्प, पुणे शहराभोवतालचा चक्राकार वळण मार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाची क्षमता वाढ, खोपोली ते खंडाळा या घाटात नवीन मार्गिकेचे बांधकाम, वर्सोवा-वांद्रे सागरी सेतू, ठाणे खाडी पूल, ग्रीनफिल्ड कोकण द्रुतगती महामार्ग, रेवस ते रेड्डी सागरी महामार्ग, वर्सोवा-विरार सागरी मार्ग प्रकल्प, विरार ते अलिबाग बहुउद्देशीय वाहतूक मार्गिका अशा विविध प्रकल्पांचे काम वेगाने सुरू असल्याचे श्री.कोश्यारी यांनी सांगितले.


परिवहन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या एकूण ११५ सेवांपैकी ८४ सेवा पूर्णत: ऑनलाईन करण्यात आल्या आहेत. मुद्रांक शुल्क आकारणीसाठी ऑनलाईन प्लॅटफॉर्म उपलब्ध करण्यात आला आहे. सौर ऊर्जा निर्मितीला चालना देण्यासाठी राज्यात महानिर्मिती कंपनीकडून एकूण १८७ आणि ३९० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. मुख्यमंत्री सौर कृषी पंप योजनेअंतर्गत एक लाख सौर कृषी पंप उद्दिष्टापैकी एकूण ९९ हजार ८५२ सौर कृषी पंप लावण्यात आले असल्याचे ते म्हणाले.


सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक विकास करण्यास राज्य शासन कटिबद्ध आहे. अल्पसंख्याक, आदिवासी, ऊसतोड कामगार किंवा असंघटित कामगार, सर्व दुर्बल घटकातील नागरिकांसाठी राज्य शासनाने मदतीचा हात दिला आहे. आपत्तीरोधक कामे करून आपत्तीमुळे कमीत कमी हानी व्हावी यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे राज्यपाल म्हणाले. राज्यातील गड आणि किल्ल्यांचे तसेच प्राचीन मंदिरांचे जतन आणि संवर्धन करण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. नवी मुंबई येथे तिरूमला तिरूपती देवस्थानास व्यंकटेश्वराचे मंदिर उभारण्यासाठी जमीन देण्याचा निर्णयही घेतला असल्याचे त्यांनी सांगितले.


व्याघ्र संरक्षणाच्या कामासह राज्यातील राखीव वनक्षेत्रात वाढ, नवीन संवर्धन राखीव क्षेत्रांची निर्मिती, जैवविविधता वारसा स्थळांची निर्मिती याला राज्य शासनाने प्राधान्य दिले आहे. राज्याच्या वृक्षआच्छादनासह कांदळवन क्षेत्रातही वाढ झाल्याचे दिसून आले असल्याचे राज्यपाल म्हणाले. राज्याला प्रगतीपथावर नेण्यासाठी राज्य शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. या दृष्टीने एक नवीन आणि बलशाली महाराष्ट्र घडविण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन राज्यपाल कोश्यारी यांनी सर्व नागरिकांना केले.