CM Uddhav Thackeray On Raj Thackeray : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरुन राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. हिंदुत्वाच्या नव्या खेळाडूंकडे लक्ष देत नाही. यांच्याकडून कधी मराठीचा खेळ कधी हिंदुत्वाचा खेळ केला जात आहे. शिवसेना हिंदुत्ववादी आहेच, असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप बघितले, अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. मुख्यमंत्री ठाकरे 'लोकसत्ता'च्या एका कार्यक्रमात बोलत होते. 


फुकटात करमणूक होत असेल तर का नाही पाहायची
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले की, हिंदुत्वाच्या नव्या खेळाडूंकडे लक्ष देत नाही. कधी मराठीचा खेळ कधी हिंदुत्वाचा खेळ सुरु आहे. असे खेळ महाराष्ट्राच्या जनतेनं पाहिलेत. फुकटात करमणूक होत असेल तर का नाही पाहायची. शिवसेना हिंदुत्ववादी आहेच. असे भोंगेधारी, पुंगीधारी खूप बघितले. हिंदुंना नासमज समजू नका. आपल्या देशात हिंदू अनेक भाषा बोलतात. आम्ही मराठी म्हणून बाकीच्यांना हाकलून द्यायचं.  चाललं नाही की परत बोलवायचं.  असले माकडचाळे चालतात हे लोकांना समजतात. आम्ही हिंदू आहोत हे सांगावं लागत नाही.  वेगवेगळे झेंडे का फडकावे लागतायत, आम्ही झेंडा बदललेला नाही.  अस्तित्व असलं तर टिकवण्याची गरज असते, असं ते म्हणाले.
 
उत्तर प्रदेशात प्रेतंही नदीत फेकली होती


भोंग्याच्या वादावर बोलताना ते म्हणाले की, भोंग्यांचा कोर्टाचा निकाल सर्वधर्मियांना लागू आहे. आपल्याला राज्याला पुढे न्यायचं आहे. उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री भोंगे काढतात तर महाराष्ट्रात का नाही असं म्हणतात.  उत्तर प्रदेशात प्रेतंही नदीत फेकली होती. तेव्हा काम न करता हे करून लोकप्रिय होणार असतील तर त्यांचं त्यांना लखलाभ आहे. सर्वांनाच डेसिबलचं बंधन पाळावं लागेल, असं ते म्हणाले. अजानच्या मागून अजानतेपणानं जे चाललंय ते जाणून घ्या, असं ते म्हणाले. 
 
कोरोना काळात कामं थांबू दिली नाहीत


राज्य सरकारच्या कामावर बोलताना ते म्हणाले की, कोरोना काळात कामं थांबू दिली नाहीत. शेतकऱ्यांनी अर्थव्यवस्थेला हातभार लावला. गती मंदावली पण थांबली नाही.  प्रत्येक क्षेत्रात आपण पुढे गेलो
सातत्यानं सर्व्हेत 5 मध्ये महाराष्ट्राचं नाव आहे. हे श्रेय कर्मचाऱ्यांचं आहे, त्यांनी महाराष्ट्र थांबू दिला नाही, असं ते म्हणाले. राज्य सरकारचं कौतुक करण्याचा मोठेपणा विरोधकांकडे नाही. घरात चांगलं काम सुरु असेल तरी शेजाऱ्यांचं कौतुक करतात. पण चांगलं काम दाखवण्याऐवजी कायदा सुव्यवस्था, भ्रष्टाचार असे आरोप केले जातात. लोकांना आता आधार देण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. 


विरोधी पक्षनेत्यांचा संवाद पूर्वी होता 
शरद पवार-बाळासाहेब ठाकरेंमधल्या मैत्रीचा धाग्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, बाळासाहेब घरी पवारांचा कधीच एकेरी उल्लेख  करत नव्हते. आता सूडबुद्धी वाढत चाललेली आहे. विरोधी पक्षनेत्यांचा संवाद पूर्वी होता. हिंदुत्वाच्या मुद्यावर जिंकलेली पहिली पार्ल्याची निवडणूक होती. मग मुंडे, महाजन आले, अटलजी आले. संवादाचा धागा होता. आता फक्त बुद्धीबळ खेळला जातो, असं ते म्हणाले. 
 
तुम्ही पक्षाचे पंतप्रधान नाहीत, देशाचे आहात


पंतप्रधान मोदींच्या टिकेवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधानांचं वक्तव्य अनपेक्षित होतं. तुम्ही उणीदुणी काढलात तर महाराष्ट्राच्या वतीनं आरसा दाखवण्याचं काम करावा लागतो. मोदी हटाव मोहिमेच्यावेळी बाळासाहेब उभे राहिले.  माझं आणि त्यांचं एक नातं आहे. मनात ओलावा जरूर आहे. म्हणजे लगेच युती होईल का? असं नाही.  महाराष्ट्राला अनपेक्षित बोल लावल्यानं मी उत्तर दिलं. लोकांचा गैरसमज होऊ नये हा उद्देश होता. आम्ही तीन पक्षांचं सरकार केलं, लोक निवडणुकीत ठरवतील योग्य की अयोग्य. तोपर्यंत सरकार पाडण्याचा आटापिटा करू नका, असंही ते म्हणाले. तुम्ही पक्षाचे पंतप्रधान नाहीत, देशाचे आहात. चीन घुसला आहे की नाही. त्यांना एकतरी दणका देऊ शकलो का, तोंडी लावायला पाकिस्तानला घेऊन बसता. काही झालं तरी पाकिस्तानचं चाटण चाटत बसता. कधीतरी चीनला दम देऊन दाखवा, असंही ते म्हणाले. 


छुप्या घडामोडींची माहिती किमान शिवसेनेला नव्हती


उद्धव ठाकरे म्हणाले, 2017 साली युतीची चर्चा सुरु आहे. छुप्या घडामोडींची माहिती किमान शिवसेनेला नव्हती. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की,  शिवसेना-भाजप युती 25 वर्षे हिंदुत्वाच्या मुद्द्यावर घट्ट होती. दाखवायचे दात कोणते आणि खायचे दात कोणते. आतातरी 3 विरुद्ध 1 असंच आताचं चित्र आहे.  तीन पक्षांच्या सरकारनं अर्धा काळ पूर्ण केला हा विरोधकांना धक्का आहे.  सरकार उत्तम चाललंय. पवारांचं मार्गदर्शन वडिलधाऱ्यांप्रमाणे आहे. आमच्या गप्पा होतात. तिघेही मिळून एकत्र काम करतोय, असंही ते म्हणाले. शिवसेनेचे आमदार नाराज असल्याबाबत विचारलं असता ते म्हणाले की, अर्थाचा अनर्थ लावला गेला. कामं रखडली, निधी आणायचा कुठून हा प्रश्न होता. सर्वपक्षीय तक्रार होती. लोक शेवटी लोकप्रतिनिधींना विचारतात. त्यामुळे त्यांचे प्रश्न सोडवायला हवेत,असं ते म्हणाले. 
 
राणा दाम्पत्यावर बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, त्यांना हाताळण्याची काळजी नाही. त्यांना हाताळणारे हात माझ्याकडे खूप आहे. त्यांना रोखण्याचं माझ्यासमोर आव्हान मला आहे. तुम्हाला हनुमान चालिसा  आताच का आठवली असंही ते म्हणाले.