Ajit Pawar on Marathi : आपल्याच मुंबापुरीत यायचं, दोन पैसे कमवायचे, त्यानंतर आपल्या राज्यात हे पैसे पाठवायचे आणि वर मराठीला विरोध करायचा, असं करणाऱ्यांनी अंतर्मुख होऊन विचार करण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. मुंबईत मराठी भाषा भवन केंद्राच्या भूमिपूजनाच्यावेळी बोलताना अजित पवार यांनी मराठी भाषाविरोधकांना खडे बोल सुनावले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले की, महाराष्ट्रात राहायचं, मराठी भाषेला विरोध करायचा हे नैतिक ढोंग काही जण करतात. इथं राज्यात येऊन प्रगती करता आणि मराठी भाषेला, माणसाला विरोध का करता असा प्रश्नही त्यांनी उपस्थित करत या मातीचे ऋण विसरू नका असेही आवाहन त्यांनी केले. दुकानांवर मराठी भाषेचे फलक लावावे यासाठी सरकारने कायदा केला. मात्र, त्याविरोधात कोर्टात जाणाऱ्यांना अजित पवार यांनी सुनावले. इकडं येऊन पैसे कमावयचे आणि मराठी पाट्यांसाठी विरोध का करायचा असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
आपल्या कुटुंबियांना मराठी शिकवावं असेही पवार यांनी म्हटले. राज्याचे सनदी अधिकारी भूषण गगराणी हे मराठीमधून IAS झाले असल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. मराठी भाषा भवनासाठी जेवढ्या निधीची आवश्यकता आहे, तेवढा निधी देण्याची तयारी सरकारची असल्याचे अजित पवार यांनी म्हटले. मराठी भाषा भवनासाठी सरकार प्रयत्न करत राहिले. अनेक अडचणीही समोर आल्यात पण आता मराठी भाषा भवनाचे मुख्य केंद्र मुंबईत उभं राहत असून नवी मुंबईत उपकेंद्र उभं राहत असल्याचे त्यांनी सांगितले. मराठी भाषा भवनासाठी जागा देणाऱ्यांचेही आभार मानत असल्याचे त्यांनी म्हटले.
मुख्यमंत्र्यांची मराठी भाषा म्हणजे...
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची मराठी भाषा म्हणजे गुदगुदल्या करत शाल जोडे मारण्याची भाषा आहे असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले. राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचीही मराठी भाषा चांगली असल्याचे सांगत त्यांनी कौतुक केले.
मराठीतून बोला...
आता दोन माणसं भेटली की कसं बोलतात ते आपल्याला माहीत आहे. सुरुवात इंग्रजीतून होते मग ते हिंदीत बोलतात त्यानंतर ते मराठीत बोलतात असेही अजित पवार यांनी म्हटले. आधी कुटुंब मोठं होते, आजी आजोबा एकत्र असायचं पण काळाच्या ओघात आता कुटुंब छोटं झालं असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- Ajit Pawar : अजित दादा थेट बोलले, मुख्यमंत्री साहेब इथे थोडा भेदभाव होतो म्हणून बातम्या येतात!
- CM Uddhav Thackeray : महाराष्ट्राला बदनाम करु नका, आम्ही सर्वजण एकत्र : मुख्यमंत्री ठाकरे
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha