मुंबई : वीज बील भरण्यापासून मोबाईलच्या रिजार्जपर्यंत अनेक गोष्टी एका आता एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. डिजिटलायझेशनच्या युगात नवतंत्रज्ञानाचा चुकीचा वापर करुन अनेक जणांकडून फसवणूक केली जाते. नागरिकांच्या फसवणुकीच्या अनेक घटना घडत असतात. त्यामुळं अनेकांना आर्थिक नुकसान सहन करावं लागतं. मात्र, महाराष्ट्र पोलिसांच्या सायबर विभागानं अशा सायबर गुन्हेगारांना दणका दिला आहे. नागरिकांकडून येणाऱ्या  तक्रारींवर कारवाई करत पोलिसांनी तब्बल 119 कोटी रुपये वाचवण्यात यश मिळवलं आहे.
 
‘नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टल’ (एनसीसीआरपी) आणि मदत 'क्रमांक 1930' वर गेल्या तीन महिन्यांत 64 हजार तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.  मुंबई वगळता संपूर्ण राज्यातून या तक्रारी प्राप्त झाल्या असून या तक्रारींसंदर्भात तात्काळ कारवाई करून सायबर फसवणूकीतील 119 कोटी रुपये वाचविण्यात महाराष्ट्र सायबर विभागाला यश आहे.


महाराष्ट्र सायबर विभागाचे नवी मुंबईतील महापे येथे आत्याधुनिक नियंत्रण कक्ष उभारण्यात आले आहे. त्यात 150 हून अधिक कर्मचारी व सायबर तज्ज्ञ 24 तास कार्यरत असतात. या मदत क्रमांकावर दररोज सरासरी आठ हजार दूरध्वनी येत आहेत. नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर तक्रार नोंदवल्यानंतर बँका आणि संबंधित विभागाशी संपर्क साधून फसवणूकीची रक्कम तात्काळ थांबवण्याचे प्रयत्न करण्यात येतात. 


गेल्या तीन महिन्यांत एकूण 64 हजार 201 सायबर फसवणूकीच्या तक्रारी नोंदवण्यात आल्या असून त्यात 1085 कोटी 32 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. त्यापैकी 119 कोटी 60 लाख रुपये वाचवण्यात महाराष्ट्र सायबर विभागाला यश आले आहे. याशिवाय 1930 मदत क्रमांकावर 1581 तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी 100 टक्के म्हणजे 2 कोटी 46 लाख रुपये वाचवण्यात महाराष्ट्र सायबर विभागाला यश आलं आहे. 


नागरिकांच्या फसवणुकीच्या प्राप्त झालेल्या 28 हजार 209 तक्रारींमध्ये सुमारे 2716 मोबाइल क्रमांक बंद करण्यात आले आहेत. सायबर गुन्ह्यांमध्ये फसवणूक झाल्यानंतर दोन तासांमध्ये मदत क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर सायबर फसवणूकीतील रक्कम तात्काळ वाचवणे शक्य होते.


फसवणूक टाळण्यासाठी काय करावं?


अनोळखी मोबाईल क्रमांकावरुन फोन आल्यास वैयक्तिक माहिती देणं टाळा.


फोनवरुन आधार कार्ड क्रमांक, पॅनकार्ड क्रमांक आणि ओटीपी अनोळखी व्यक्तीला सांगू नका.


बँका किंवा आर्थिक संस्थांकडून ओटीपीची फोनवरुन मागणी केली जात नाही.


मोबाईलवर व्हाटसअपद्वारे येणाऱ्या अनधिकृत अॅप्लिकेशन्सचं इन्साटलेशन टाळा.


तुमच्या वायफायचा पासवर्ड देखील शेअर करणं टाळा.


इतर बातम्या :


Cidco Homes Lottery 2025 : शेवटची संधी चुकवू नका, सिडकोच्या 26000 घरांच्या नोंदणीसाठी दोन दिवस बाकी