मुंबई : राज्यातील लसीकरणात कोविन अॅपमुळे गोंधळ वाढत आहे. जिथे लस उपलब्ध आहे तो स्लॉट दिसल्यावर लोक लसीसाठी बुकिंग करत आहेत. यामुळे मोठ्या शहरातून छोट्या तालुक्यात लसी घ्यायला नागरिक येत असल्याचं चित्र महाराष्ट्रात आहेत. यामुळे स्थानिकांचं लसीकरण मागे पडत आहे, असं काँग्रेसचे नेते आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले.


बाळासाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यातील उदाहरण दिलं. संगमनेरमधील घोलेवाडी गावात कोरोना लसीचे 400 डोस आले. त्यातील 180 डोस हे बाहेरच्या जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना मिळाले. संगमनेरला नाशिकहून लोक येत आहेत समजू शकतं पण थेट परभणी इतकंच नाही तर राज्याच्या बाहेरुन हैदराबादवरुन लोक लसी घेत असल्याचे समोर आलं, त्यामुळे स्थानिकांना लसीकरणात प्राधान्य मिळत नसल्याचं बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं.


कोविन अॅपमुळे हे गोंधळ वाढत आहेत. राज्यावर 18 ते 44 वयोगटाच्या लसीकरणाची जबाबदारी आहे तर लस कशी द्यायची याचं व्यवस्थापन राज्याने करायला हवं. राज्याचे अॅप असायला हवं. याबाबत मुख्यमंत्र्यांनी केंद्राला पत्र लिहिलं आहे पण केंद्र याबाबत लक्ष देणार का असा सवाल थोरात यांनी विचारला आहे.


राज्यात जिल्हा बंदी असताना लसीकरणसाठी नागरिक एक जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जात आहेत. हा गोंधळ केंद्राच्या कोविन अॅपमुळे होत आहेत. हे अॅप बंद झालं किंवा राज्याने आपलं अॅप तयार केलं तर प्रश्न सुटतील अशी भूमिका काँग्रेस मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मांडली आहे..


एकूणच लसीकरणाबाबत केंद्राने योग्य धोरण ठरवलं नसल्यामुळे 45 वर्षांवरील वयोगटातील लोकांच्या दुसऱ्या डोसबाबत प्रश्न उभे झाले आहेत. त्यात वय वर्ष 18 ते 44 वयोगटातील नागरिकांसाठी लस उपलब्ध नसल्याने गोंधळाची परिस्थिती आहे, असं थोरात म्हणाले.


स्थानिकांना लसीकरणात प्राधान्य देण्यासाठी आपण छोटे ग्रुप बनवून लस देऊ शकतो, असं बाळासाहेब थोरात यांनी सुचवलं तसंच केंद्राचं अॅप बंद झालं तर गोष्टी सुधारतील, असंही ते म्हणाले.


लसीअभावी 45 वर्षांवरील नागरिकांना दुसरा डोस मिळत नाही : थोरात
18 ते 44 वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाची जबाबदारी केंद्र सरकारने राज्याला दिली आहे. परंतु लस उपलब्ध नाही. 45 वर्षांवरील नागरिकांना लस द्यायची आहे. या वयोगटातील काहींनी पहिला डोस घेतला, परंतु लसीअभावी  दुसरा डोस मिळत नाही. राज्याला फक्त अडीच लाख डोस आले. यात मोठा घोटाळा आहे, असा थोरात यांनी केला.