मुंबई : ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातील वादाचा नवा अंक आज (11 फेब्रुवारी) समोर आला. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे उत्तराखंडला जाण्यासाठी सरकारी विमानाने निघाले होते. मात्र राज्यपालांना सरकारी विमानाने प्रवास करण्यास परवानगी ठाकरे सरकारकडून मिळाली नव्हती. त्यामुळे विमानात बसलेले राज्यपाल खाली उतरले आणि खाजगी विमानाने उत्तराखंडला रवाना झाले. यावरुन भाजप नेत्यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे तर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी तांत्रिक कारणामुळं परवानगी नाकारली असावी असं म्हटलं आहे.


मीडियामध्ये ही बाब समोर आल्यानंतर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. त्यानंतर आता राज्यपालांच्या कार्यालयाकडूनही स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. राज्यपाल विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्याचं कळवलं, असं राज्यपाल कार्यालयाने म्हटलं आहे. राज्यपाल कार्यालयाने याबाबत परिपत्रक काढलं आहे.




काय म्हटलंय राज्यपालांच्या कार्यालयाने? 


1. महाराष्ट्र आणि गोव्याचे माननीय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी एका सरकारी कामासाठी उत्तरखंडला जाणार होते. मसुरी उद्या (12 फेब्रुवारी) सकाळी दहा वाजता होणाऱ्या लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ अॅडमिनिस्ट्रेशनमध्ये आयएएस अधिकाऱ्यांच्या 122 व्या इंडक्शन ट्रेनिंग प्रोग्रॅमच्या व्हॅलेडिक्टरी प्रोग्रॅमला ते हजेरी लावणार होते.


2. यासाठी राज्यपाल आज (11 फेब्रुवारी) सकाळी दहा वाजता मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन देहराडूनला जाणार होते.


3. या दौऱ्यासाठी राज्यपालांच्या सचिवालयाने महाराष्ट्र सरकारच्या अधिकाऱ्यांना 2 फेब्रुवारी 2021 रोजी पत्र लिहून राज्यपालांसाठी सरकारी विमान वापरण्याची परवानगी देण्याची मागणी केली होती. सचिवालयान मुख्यमंत्र्यांनाही याबाबत माहिती दिली होती.


4. आज (11 फेब्रुवारी 2021) माननीय राज्यपाल छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमातळावर 10 वाजता पोहोचले आणि सरकारी विमानात बसले. मात्र त्यावेळी त्यांना सरकारी विमान वापरण्याची परवानगी मिळाली नसल्याची माहिती देण्यात आली.


5. यानंतर माननीय राज्यपालांच्या सूचनेनुसार तातडीने मुंबईहून दुपारी सव्वाबारा वाजता उड्डाण करणाऱ्या खासगी विमानाचं तिकीट राज्यपालांसाठी बुक करण्यात आलं आणि ते देहराडूनला रवाना झाले.




राज्यपाल विमान आणि मुख्यमंत्री मान्यता नेमकं काय झालं?
राज्यपाल कोणत्याही दौऱ्याला जाताना विमान हवं असेल की महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे अर्ज केला जातो. महाराष्ट्र विमान प्राधिकरण राज्यपाल त्यांचे दौरे आणि त्यांच्या अर्जाची माहिती मुख्यमंत्री कार्यालय यांच्याकडे पाठवते. मुख्यमंत्री कार्यालय त्यानुसार मान्यता देतात आणि विमानाच्या प्रवासाला परवानगी मिळते. राज्यपालांनी आपल्या दौऱ्याबाबत गेल्या आठवड्यात महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे अर्ज केला होता. याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाकडे देण्यात आली होती. पण राज्यपालांच्या देहराडून दौऱ्याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून परवानगी मिळाली नाही. मुख्यमंत्री कार्यालयाने या दौऱ्याला मान्यता दिलेली नाही, हे काल राजभवनाला कळवले देखील होते, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. राज्यपाल विमानात बसल्यावर मान्यता नाही हे कळल्यावर मग सगळीकडे पुन्हा फोनाफोनी सुरु करण्यात आली.


Denial to Govenor's Flight | राज्यपाल विमानात बसल्यानंतर परवानगी नसल्याचं कळवलं,राजभवनाचं स्पष्टीकरण