Nawab Malik Health Serious : मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीच्या अटकेत असलेले राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. नवाब मलिक यांना मुंबईतील जेजे रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आलं आहे. सोमवारी सकाळी रक्तदाब कमी झाल्यानं आणि पोटाच्या समस्येमुळं मलिकांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. तसेच, त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती जेजे रुग्णालय प्रशासनानं एबीपी माझाला माहिती दिली आहे. तर, सध्या नवाब मलिक आयसीयूमध्ये दाखल असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती त्यांच्या वकिलांनी मुंबईतील विशेष न्यायालयाला दिली आहे.
गेल्या आठवड्यात आर्थर रोड कारागृहात कैदेत असलेले 62 वर्षीय मंत्री नवाब मलिक यांनी खासदार आणि आमदारांविरुद्धच्या फौजदारी खटल्यांच्या सुनावणीसाठी स्थापन केलेल्या विशेष न्यायालयात वैद्यकीय आधारावर अंतरिम जामीन मागितला होता. दरम्यान, ईडीनं अंतरिम जामीन अर्जाला विरोध केला आणि मलिकांनी मागितलेला वैद्यकीय जामीन म्हणजे, कायद्याच्या तावडीतून सुटण्याचा प्रयत्न असल्याचा दावा केला होता.
सोमवारी या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान, मलिक यांचे वकील कुशल मोर यांनी न्यायालयाला सांगितलं की, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री नवाब मलिक यांचे कुटुंबीय त्यांना घरचं जेवण देण्यासाठी गेले होते. त्यावेळी मलिक कारागृहात नसून प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलं. मोर यांनी न्यायालयाला सांगितलं की, दोन महिन्यांपूर्वी अटकेत असलेले मलिक गेल्या तीन दिवसांपासून आजारी आहेत. तसेच, त्यांची प्रकृती गंभीर आहे.
सर जेजे रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक संजय सुरासे यांनी सांगितलं की, मलिक यांना सकाळी 10 वाजता रुग्णालयात आणण्यात आलं. पोटाच्या समस्येच्या तक्रारीमुळे त्यांना रुग्णालयात दाखल केलं होतं. तसेच, त्यावेळी त्यांचा रक्तदाबही कमी झाला होता. त्यामुळे त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे."
मलिकांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्याची वकीलांची मागणी
वकीलांनी नवाब मलिकांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्याची मागणी केली आहे. मलिकांच्या काही चाचण्या करायच्या आहेत, त्या करण्याची सुविधा जेजे रुग्णालयात नसल्यामुळे नवाब मलिकांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी देण्याची मागणी वकीलांनी केली आहे. त्यांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायाधीशांनी सांगितलं की, सरकारी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांकडून आरोपीच्या प्रकृतीबाबत अहवाल घेणं आवश्यक आहे. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना वैद्यकीय अधिकाऱ्याकडून अहवाल गोळा करण्याचे निर्देश दिले आणि मंत्री मलिक यांच्या उपचारासाठी आवश्यक असलेल्या सर्व चाचण्या करण्याची सुविधा आहे की नाही हे तपासण्याचेही निर्देश दिले आहेत.