Mumbai Woman Falls Into Manhole : मुंबई म्हणजे अखंड धावणारी मायानगरी. याच मायानगरीत मुसळधार पावसाने हाहाकार उडवला. रेल्वेचे ट्रॅक पाण्याखाली बुडाले, रस्त्यांना तलावांचं स्वरूप आलं. कमरेइतक्या पाण्यातून मुंबईकरांना वाट शोधावी लागली. अशीच वाट शोधताना एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. विमल गायकवाड त्यांचं नाव. सिक्युरिटी गार्डची नोकरी करत त्या कुटुंबाचं पोट भरत होत्या. त्यांच्या कुटुंबात तरी कोण? तर फक्त आजारी पती. त्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या पतीवर दु:खाचा डोंगर कोसळलाय. खरंतर, विमलताईंचा हा अपघात झालेला नाही, तर यंत्रणेने केलेला हा घातपातच म्हणायला हवा.
मुंबई एक असं शहर जे झोपत नाही असं म्हणतात. पण याच मुंबईत राहणारा मुंबईकर हातावर फक्त घड्याळ नाही तर मृत्यूही बांधून फिरतो. परतीच्या पावसानं मुंबईत पुन्हा दाणादाण उडवलीय. त्याचमुळे एका महिलेचा उघड्या मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालाय.
रस्ता क्रॉस करताना मॅनहोलमध्ये पडल्या
मुंबईच्या उपनगरांमध्ये बुधवारी अक्षरश: गुडघाभर पाणी साचलं होतं. गाड्या बंद पडत होत्या. अशा परिस्थितीमध्ये विमल गायकवाड आपलं काम संपवून सिप्झ कंपनीतून घराच्या दिशेनं निघाल्या. पवईच्या मिलिंद नगरला असणाऱ्या घराच्या दिशेनं जात असताना त्यांनी रस्ता क्रॉस केला आणि अचानक काहीही कळायच्या आत त्या उघड्या मॅनहोलमध्ये पडल्या.
नाका-तोंडात पाणी गेलं होतं
जागोजागी मेट्रोची कामं सुरू असल्यानं तिथे उघड्या राहिलेल्या या मॅनहोलनं विमल गायकवाड यांचा बळी घेतला.हा अपघात इतका भयंकर होता की पडल्यानंतर त्या सुमारे दीडशे मीटर वाहून गेल्या. कुणीतरी मॅनहोलमध्ये पडलं अशी बातमी मिळताच तातडीनं अग्निशमन विभागाचं पथक दाखल झालं. त्यांनी शर्थीच्या प्रयत्नांनी विमल यांना बाहेर काढलं आणि त्यांना कूपर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र नाकातोंडात पाणी जाऊन आणि गुदमरून त्यांचा मृत्यू झाला होता.
विमल गायकवाडांचे कुटुंब उद्ध्वस्त
45 वर्षीय विमल गायकवाड या सिप्झमध्ये सुरक्षा रक्षकाचं काम करायच्या. त्यांना कोणतंही अपत्य नव्हतं. त्यामुळे पतीच्या आजारपणामुळे नोकरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायच्या. मात्र त्यांच्या जाण्यानं एक कुटुंबच उद्ध्वस्त झालंय. हा अपघात नसून ही शांत डोक्यानं घडवून आणलेली हत्याच आहे असा आरोप काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी केला.
मॅनहोलमध्ये पडून मृत्यू झालेली मुंबईतील ही पहिलीच घटना नाही. मात्र इतक्या घटना वारंवार घडल्यानंतरही प्रशासनाला अजूनही जाग कशी येत नाही हा खरा प्रश्न आहे. विमल गायकवाड यांच्या मृत्यू प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही. त्यामुळे जोपर्यंत अशा प्रकरणात जबाबदार असणाऱ्या प्रशासनातल्या अधिकाऱ्यांना धारेवर धरून शिक्षा होणार नाही, तोवर विमल यांना न्यायही मिळणार नाहीच.
ही बातमी वाचा: