मुंबई : सध्या प्लास्टिकच्या अंड्यांमुळे लोकांमध्ये संदिग्धता आहे. परंतु प्लास्टिकच्या अंड्यांबद्दल आतापर्यंत केलेल्या तपासणीत काहीही चुकीचं आढळलं नसल्याची माहिती पशुसंवर्धन व दुग्धविकासमंत्री महादेव जानकर यांनी दिली.


महादेव जानकर यांनी सोमवारी अरबी समुद्रात बोटीने प्रवास करत मत्स्य विभागाच्या कामाची पाहणी केली. यावेळी 'एबीपी माझा'शी बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

कोलकातामध्ये प्लास्टिकची अंडी आढळल्याच्या बातमीने खळबळ उडाली होती. त्यानंतर डोंबिवली आणि कल्याणमध्येही प्लास्टिकची अंडी सापडल्याचं समोर आलं होतं. पण, यानंतर केलेल्या तपासणीत काहीही चुकीचं आढळलं नसल्याचं जानकर यांनी सांगितलं.

मात्र प्लास्टिकच्या अंड्यांच्या तक्रारी असल्यास कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्याचं जानकर म्हणाले.  तसंच लोकांनी घाबरु नये, असं आवाहनही त्यांनी केलं.

दरम्यान, मत्स्य विभागाच्या कामाच्या पाहणीदरम्यान महादेव जानकर यांनी कोळी बांधव सामना करत असलेल्या अडचणींचाही आढावा घेतला.


प्लास्टिकची अंडी ओळखायची कशी?

- प्लास्टिक अंड्यांच्या आतला पिवळा भाग हा जिलेटीन, अॅल्युमिनियम, कॅल्शियम, सोडिअम एल्गिनाईटसारख्या रसायनांनी बनलेला असतो. याच रसायनांनी अंड्यांचा बाहेरील भाग बनवला जात असल्याचीही शक्यता आहे.

- प्लास्टिकची अंडी उकडल्यानंतर अंड्यांचा बाहेरचा भाग तोडल्यास कडक होतो. नेहमीच्या अंड्यांपेक्षा बनावट अंड्यांच्या आतील पिवळा भागाचा रंग अधिक गडद असतो.

- बनावट अंड्याच्या आतील पिवळा पदार्थ तव्यावर टाकल्यास तो तसाच राहतो. साधारण अंड्यांच्या पिवळ्या पदार्थासारखा तव्यावर पसरत नाही.

अंड्यांमधील ही हानीकारक रसायनं तुमच्या जीवाला धोकादायक ठरू शकतात. अंडी आपल्या जेवणाच सर्रास वापरली जातात. त्यामुळं चुकून अशी प्लास्टिकची अंडी आपल्या पोटात गेली तर मोठी किंमत मोजावी लागू शकते.

संबंधित बातम्या


कोलकाता, चेन्नई पाठोपाठ डोंबिवलीतही प्लास्टिकची अंडी?