मुंबई : चेंबूरच्या अमर महाल पुलामुळे होणारी वाहतूक कोंडी पुढचे चार महिने कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात येते आहे. उड्डाणपुलाचा नादुरुस्त भाग नव्यानं बसवण्यात येणार असून या कामाला किमान चार महिने लागतील अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे.


या पुलाची वजन पेलण्याची क्षमता 10 टन इतकी असून त्यावर 25 टनपर्यंतचा भार असलेली कंटेनर वाहतूक होतेय. वाहतूक कोंडीमुळे ही जड वाहनं जास्त काळ पुलावर राहत असल्यानंच हा पूल नादुरुस्त झाल्याचं सांगण्यात येत आहे.

अमर महल उड्डाणपूल 1995 च्या सुमारास वाहतुकीकरता खुला झाला. भविष्यातील जड वाहतूक लक्षात घेऊन हा उड्डाण पुल तयार करण्यात आला. मात्र आता 10 टन ऐवजी 25 टनपर्यंत भार असलेली कंटेनर वाहतूक होत आहे.

दरम्यान पुलाच्या दुरुस्तीच्या कामासाठी समिती नेमण्यात आली असून माजी सार्वजनिक बांधकाम सचिव प्रमोद बंगिरवार त्याचे अध्यक्ष आहेत. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, वाहतूक कोंडीमुळे जड वाहने हे उड्डाणपुलांवर थांबवण्याचा काळ वाढला आहे. याची परिणिती ही अमर महाल उड्डाण पूल नादुरुस्त होण्यात झाल्याचं बोंगिरवार यांनी स्पष्ट केलं आहे.

संबंधित बातम्या

मुंबईतील अमर महल पूल अनिश्चित काळासाठी बंद


चेंबूरमध्ये पुलाच्या दुरुस्तीचं काम, वाहतूक कोंडीने मुंबईकर हैराण