मुंबई: बहुचर्चित महादेव बेटिंग ॲपचा प्रचार आणि प्रसार केल्याच्या आरोप प्रकरणी अभिनेता साहिल खान याला मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिसांनी छत्तीसगढमध्ये जाऊन साहिल खानला (Sahil Khan) ताब्यात घेतले. आता त्याला मुंबईत आणले जाणार आहे. त्यामुळे आता साहिल खानच्या चौकशीवेळी महादेव बेटिंग ॲप प्रकरणात (Mahadev Betting App) आणखी काही नवीन माहिती समोर येते का, याची अनेकांना उत्सुकता लागली आहे.
साहिल खान याने अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली. मात्र, न्यायालयाने त्यास नकार देत त्याची याचिका फेटाळून लावली होती. माटुंग्यातील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश बनकर यांच्या तक्रारीवरून महादेव ऑनलाईन गेमिंग-बेटिंग अॅप प्रकरणात ३१ हून अधिक जणांविरोधात माटुंगा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. "द लायन बुक ॲप" नावाच्या एका ॲपमध्ये साहिल खान हादेखील भागीदारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आल्यानंतर त्याच्यामागे पोलीस चौकशीचा ससेमिरा लागला होता.
यानंतर साहिल खान यांची मुंबई पोलिस आयुक्तालयात चौकशी करण्यात आली होती. या गुन्ह्याची व्याप्ती लक्षात घेऊनच मुंबई पोलिसांच्या गुन्ह्यांच्या आधारावर सक्तवसुली संचलनालयाने अर्थात ईडीने गुन्हा दाखल करत, तपास सुरू केला होता. चौकशीअंती हा एकूण 15 हजार कोटींचा हा गैरव्यवहार असल्याची माहिती तपास यंत्रणांकडून देण्यात आली आहे. याच गुन्ह्यांत ईडीने काही दिवसांपूर्वी मालमत्तांवर जप्तीची कारवाईदेखील केली होती. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अभिनेता साहिल खानवर अटकेची कारवाई होणार का, हे पाहणं महत्वाचे ठरेल.
साहिल खान याची अटकपूर्व जामिनची याचिका फेटाळल्यानंतर तो मुंबईतून फरार झाला होता. मुंबईतून गोवा, गोव्यातून कर्नाटक, मग हैद्राबाद असा प्रवास करत तो छत्तीसगढमध्ये पोहोचला. मुंबई पोलिसांचे पथकही त्याच्या मागावर होते. हैद्राबादहून साहिल खान हा छत्तीसगड येथील जगदलबपूर येथे आला असताना पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले.
केंद्र सरकारचं मोठं पाऊल, महादेव बुक अॅपसह 22 बेटिंग अॅप्लिकेशन्सवर बंदी
महादेव बेटिंग ॲपच्या माध्यमातून मोठा पसारा
महादेव बेटिंग या ॲपशी संबंधित 67 बेटिंग संकेतस्थळे असून ती सर्व परदेशातून नियंत्रित केली जात असल्याची माहिती तपासावेळी समोर आली होती. या ॲप्सची सूत्रे हलवण्यासाठी दोन हजारहून अधिक बनावट सिमकार्ड वापरली गेली. सर्वसामान्यांना विविध खेळांवर सट्टा लावून पैसे जिंकण्याचे आमिष दाखवले गेले. त्याचप्रमाणे, बनावट कागदपत्रांच्या आधारावर उघडलेली 1700 हून अधिक बँक खाती पैसे गोळा करण्यासाठी वापरली गेली. त्यानंतर, पैसे हवाला आणि कूटचलनाद्वारे (क्रिप्टोकरन्सी) वळविण्यात आल्याचे तपासात निष्पन्न झाले होते.
आणखी वाचा
महादेव बेटिंग अॅपचा मालक ताब्यात, दुबईत बेड्या; रवी उप्पलविरोधात रेड कॉर्नर नोटीस