मुंबई :   मालवणमधला शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी (Shivaji statue collaps)  मविआ (Maha Vikas Aghadi)  आज जोडे मारो  आंदोलन करणार आहे.  दरम्यान पुतळा कोसळल्याप्रकरणी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माफी मागितली आहे. मात्र तरीही महाविकास आघाडी आजच्या आंदोलनावर ठाम आहे. मविआ आज मुंबईत सरकारविरोधात जोडे मारो आंदोलन करणार आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया पर्यटकांसाठी सकाळी 10 वाजल्यापासून बंद राहणार आहे


महाविकासआघाडीचा मोर्चा हुतात्मा चौक ते गेटवे ऑफ इंडियापर्यंत (Gateway of India) मोर्चा काढण्यात येणार आहे. आणि त्यानंतर गेटवे ऑफ इंडियावरच्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर आंदोलन करण्यात येणार आहे. दरम्यान या आंदोलनाला पोलिसांची अजून परवानगी मिळालेली नाही. मात्र तरी आज मविआच्या आंदोलनाला महायुती आंदोलनातूनच उत्तर देणार आहे. मविआच्या निषेधार्थ महायुतीने आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली.


 पोलीस बंदोबस्त तैनात 


महाविकास आघाडीच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेटवे ऑफ इंडिया सकाळी दहा वाजल्यापासून पुढील आदेशापर्यंत पर्यटकांसाठी बंद राहणार आहे .  गेट ऑफ इंडिया या ठिकाणी असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या तिथे महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून निषेध व्यक्त केला जाणार आहे. गेटवे ऑफ इंडियाच्या  परिसरात आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर  पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. 


महाविकास आघाडीच्या आंदोलनाला भाजप आंदोलनातून प्रत्युत्तर देणार


महाविकास आघाडीच्या आंदोलनाला आज भाजप आंदोलनातून प्रत्युत्तर देणार आहेत. मविआच्या नेत्यांना सद्बुद्धी द्यावी म्हणून शिवरायांच्या पुतळ्यासमोर राज्यव्यापी आंदोलन होणार आहे. सिंधुदुर्ग घटनेबद्दल माफी मागून सुद्धा महाविकास आघाडी आंदोलन करत आहे त्याचा निषेधार्थ आज सकाळी 9 पासून राज्यभर आंदोलन केली जाणार आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली नागपुरात आंदोलन होणार आहे. सिंधुदुर्ग नारायण राणे, रत्नागिरीत रवींद्र चव्हाण, लातूर रावसाहेब दानवे, संभाजीनगर अतुल सावें, भागवत कराड, ठाण्यत निरंजन डावखरे, पालघरात हेमंत सावरा, तर मुंबईत प्रसाद लाड यांच्या नेतृत्वात आंदोलन केली जाणार आहेत.


हे ही वाचा :


Vijay Wadettiwar : चोरांचे अन् डाकूचे राज्य जावे ही श्रींची इच्छा; विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवर घणाघात