Maha Vikas Aghadi Morcha: काल मुंबईत महाविकास आघाडीनं मोठा मोर्चा काढला. या मोर्चानंतर झालेल्या सभेत उद्धव ठाकरे, शरद पवार, अजित पवार, संजय राऊतांसह मविआच्या नेत्यांनी भाजप-शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे. मात्र या मोर्चानंतर भाजपनं एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. ज्याची चर्चा सध्या होतेय. भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मोर्चासाठी मविआकडून पैसे वाटप केल्याचा आरोप करत पैसे वाटतानाचा एक व्हिडीओ ट्वीट केला आहे. 


उपाध्ये यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की, मुंबईतील पत्रकार संघाच्या जवळ असलेल्या काँग्रेस कार्यालयाजवळ मोर्चा सुरू असतानाचे दृश्य आहे.  मविआ मोर्चात थोडीफार लोक जमली ती सुध्दा अशा पध्दतीने, असं उपाध्ये यांनी म्हटलं आहे. 






जे व्हिडिओ बाहेर येत आहेत, ते लाजिरवाणे- देवेंद्र फडणवीस


यावर बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे की, जे व्हिडिओ बाहेर येत आहेत, ते लाजिरवाणे आहेत. मोर्चात आलेल्या लोकांना आपण का आलो हे माहीत नाही. कोणत्या पक्षाचा मोर्चा आहे हे माहित नाही. पैसे वाटले जात आहेत आणि एवढं सगळं करूनही ते संख्या जमवू शकले नाही.. त्यामुळे जनतेला काय हवं आहे हे आज दिसून आले आहे. जनतेला ही माहित आहे की हे फक्त राजकारणासाठी महापुरुषांच्या नावाने राजकारण करत आहे. नॅनो मोर्चा निघाला त्यामुळे मुंबईत कोणाची ताकद आहे हे दिसून आले आहे, असं फडणवीस म्हणाले. 


तर भाजप आमदार प्रवीण दरेकर यांनी म्हटलं आहे की, आजच्या मोर्चा पूर्णपणे फसला आणि फेल गेला आहे, आज या व्हिडिओच्या माध्यमातून ही गर्दी आणली पैसे देऊन आणली.  आपण जे गर्दी आणली ती पण पैसे देऊन आणली, असं दरेकर म्हणाले. 


अजित पवार म्हणाले, पैसे वाटप झालेले नाहीत. 
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आरोप फेटाळत म्हटलं आहे की, माझ्या माहितीप्रमाणे पैसे वाटप झालेले नाही, मी शेवटपर्यंत मोर्च्यात होतो, कारण नसताना बदनामी होत आहे. उपमुख्यमंत्री यांनी मोर्चाला नॅनो म्हणावं की स्कूटर म्हणावं हा त्याचा विषय आहे, आम्ही त्याला महत्व देत नाही. बेताल वक्तव्याचा विरोधात जनतेने सहभागी होण्याचं आवाहन केले होते, लोक सहभगी झाले.. महाविकास आघाडीसाठी आम्ही एकत्र येत असतोच, पण मोर्चाच्या निमित्याने एकत्र आलो त्यामुळे समाधानी आहे.  


ही बातमी देखील वाचा