Maharashtra Tripura Violence: त्रिपुरात एका समाजावर होत असलेल्या कथित अत्याचाराविरोधात महाराष्ट्रात मागील वर्षी एका आंदोलनाला हिंसक वळण लागलं होत. यात अमरावती (Amravati ), नांदेडसह (Nanded) मराठवाड्यातील काही जिल्ह्यात दगडफेक, जाळपोळ आणि तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. यासोबतच मालेगावमध्ये झालेल्या आंदोलनादरम्यान मोठा हिंसाचार झाला होता. मात्र त्या हिंसाचाराविरोधात मुंबईत भारतीय जनता पार्टीच्यावतीनं एक आंदोलन करण्यात आलं होतं. यात आमदार प्रवीण दरेकर (Mla Praveen Darekar), कॅबिनेट मंत्री मंगलप्रभात लोढा (Cabinet Minister Mangal Prabhat Lodha), विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narvekar), आकाश पुरोहित, अतुल शहा, राजेश शिरवळकर, शरद चेतनकर यांच्याविरोधात आझाद मैदान पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र आता दरेकर, नार्वेकर, मंगलप्रभात लोढा यांच्यासह एकूण 7  जणांची निर्दोष सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी गिरगांव महानगर दंडाधिकारी न्यायाधीश एन.ए. पटेल यांनी हा निर्णय सुनावला आहे. या सर्व आरोपींविरोधात आयपीसी कलम 269, 447, 37(1) (3), 135 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता.


काय आहे प्रकरण? 


बांगलादेशमधील कमिलमी येथे मागील 20 वर्षांपासून दरवर्षी येथील हिंदू लोक मंडपात दुर्गापूजा करतात. नोव्हेंबर 2021 मध्ये येथे दुर्गा पुजा समाप्तीच्या दिवशी जवळपास अर्ध्या रात्रीपर्यंत लोकांची मंडपामध्ये ये-जा सुरु होती. लोकांची ये-जा बंद झाल्यानंतर आयोजकांनी मंडपाचा मुख्य पडदा बंद केला. स्टेजपासून जवळच मूर्ती होती. त्या मूर्तीजवळ दुसऱ्या धर्माचा ग्रंथ होता. पण हा धर्मग्रंथ तिथं आला कसा हे समजलं नाही. आयोजन स्थळी सुरक्षेसाठी सकाळपासून खासगी सुरक्षारक्षक उपस्थित होता. मात्र, धर्मग्रंथ आला कसा हे समजलं नाही. दुर्गा पूजा मंडपात तोडफोड आणि धर्मग्रंथ ठेवल्याच्या घटनेनंतर काही छायाचित्रे आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. याशिवाय धार्मिक पोस्टही व्हायरल झाल्यानंतर तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. या व्हायरल मेसेजमुळे बांगलादेशमधील वातावरण तापलं होतं. त्यामुळे हिंसाचार भडकला. त्यावेळी बांगलादेशमध्ये 22 जिल्ह्यात लष्कर तैनात करण्यात आलं होतं.  


यानंतर बांगलादेशातील घटनेच्या निषेधार्थ त्रिपुरातील पानीसागरमध्ये विविध ठिकाणी विश्व हिंदू परिषदेनं मोर्चे काढले. या मोर्चांना हिंसक वळण लागलं आणि घरांची, दुकानांची तोडफोड करण्यात आली. यावेळी काही धार्मिक स्थळांचीही तोडफोड झाली होती. त्यानंतर सोशल मिडीयावर या तोडफोडीचे व्हिडीओ काही समाजकंटकांकडून व्हायरल करण्यात आले. त्यानंतर त्रिपुरात हिंसाचार मोठ्या प्रमाणात उफळला. यानंतर याचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटले होते.