मुंबई : सरकारी नोकर भरतीसाठी फडणवीस सरकारच्या काळात सुरू असलेले महापोर्टल ठाकरे सरकारने अखेर बंद केलं आहे. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सततच्या तक्रारीनंतर आज हा मोठा निर्णय घेऊन नव्या पोर्टलसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. फडणवीस सरकारच्या काळात महापोर्टलद्वारे (Maha pariksha portal) सरकारी भरती करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्याबाबतीतच्या त्रुटींमुळे परीक्षार्थींकडून वारंवार तक्रारी येत होत्या. त्याबाबत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी ठाकरे सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला होता. त्याला अखेर यश आलं आहे.
महापोर्टल बंद व्हावे यासाठी अनेक जिल्ह्यात आंदोलन झाली तरी सुद्धा यावर निर्णय मात्र होत नव्हता. अनेक परीक्षांमध्ये महापोर्टल बाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. आता मात्र, नव्या पोर्टलसाठी निविदा प्रक्रिया महाआयटीकडून राबवली जाणार आहे. त्यामुळे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंदाची ही बातमी आहे.
महाआयटीकडे पुरेसे मनुष्यबळ नसल्याने एका कंपनीची(पोर्टल) निवड महाआयटी करणार आहे. याआधी ज्या जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या त्याबाबतची माहिती महाआयटीकडून त्या त्या विभागाला हस्तांतरित केली जाणार आहे. त्यामुळे पुढची भरती प्रक्रिया देखील सुलभ होईल याची सर्व खबरदारी घेण्यात आली आहे
मात्र, परीक्षा या ऑफलाइन होणार की ऑनलाइन ? याबाबत अद्याप या शासन निर्णयात स्पष्ट केलेलं नाही. शिवाय महापोर्टलबाबत कोणत्याही चौकशी बाबत अद्याप निर्णय झालेला नाही. मात्र, आता होणाऱ्या परीक्षा या त्या त्या विभागामार्फ़त नव्या पोर्टलच्या माध्यमातून घेतला जाणार आहे त्यामुळे गोंधळ या भरतीमध्ये होणार नाही याची पूर्णपणे खबरदारी महाआयटी घेणार आहे.
महापरीक्षा पोर्टल रद्द करण्याचा आणि त्या जागी एक पर्यायी व्यवस्था विभागीय स्तरावर आणण्याच्या निर्णयाचे स्वागत करतो. पण या भरती प्रक्रियेत एमपीएससी ला सामावून घेण्याची तसेच मागील काळात महापरीक्षा पोर्टलच्या वतीने झालेल्या भरती प्रक्रियेतील गैरव्यवहारांच्या चौकशाची मागणी करतो, असं ट्वीट सत्यजित तांबे यांनी केलं आहे.