मुंबई : धार्मिक स्थळांवरील लाऊडस्पीकरबाबत मार्गदर्शक ठरवण्यासाठी ठाकरे सरकारने आज (25 एप्रिल) बैठक बोलावली आहे. या बैठकीला जवळपास सर्वच पक्षांनी उपस्थित राहण्यास संमती दिली असली तरी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे या बैठकीला उपस्थित राहणार नाहीत. मनसेकडून बाळा नांदगांवकर, संदीप देशपांडे, नितीन सरदेसाई सर्वपक्षीय बैठकीत प्रतिनीधीत्व करणार आहेत.


दरम्यान या सर्वपक्षीय बैठकीआधी मनसे पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. मनसे नेते बाळा नांदगांवकर यांच्या निवासस्थानी तिघांमध्ये ही बैठक झाली. राज ठाकरे यांच्या औरंगाबादमधील सभेआधी सर्वपक्षीय बैठकीत मनसेच्या भूमिकेसंदर्भात पदाधिकाऱ्यांमध्ये चर्चा झाली. या बैठकीनंतर सर्वपक्षीय बैठकीसाठी मनसे पदाधिकारी सह्याद्री अतिथी गृहाकडे रवाना झाले आहेत. त्यामुळे आजच्या सर्वपक्षीय बैठकीत मनसे नेमकी कोणती भूमिका घेते, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.


Loudspeaker Controversy : भोंग्यासंदर्भात ठाकरे सरकारची आज सर्वपक्षीय बैठक, राज ठाकरे उपस्थित राहणार नाहीत


बैठक का बोलावावी लागली?
खरंतर महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा वाद राज ठाकरेंनी याच महिन्यात सुरु केला होता. त्यांनी 14 दिवसांपूर्वी आपल्या पक्षाच्या एका कार्यक्रमात उद्धव सरकारला राज्यातील सर्व मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवावेत, असं सांगितलं होते. राज्य सरकार हे काम करणार नसेल, तर ते स्वतः ते लाऊडस्पीकर काढून मशिदींसमोर हनुमान चालीसा वाजवतील, असं उत्तर दिले. तब्बल 10 दिवसांनंतर राज ठाकरे पुन्हा या विषयावर बोलले आणि त्यांनी देशातील हिंदूंना एकत्र येण्यास सांगितले होते. 3 मेपर्यंत सर्व मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवले नाहीत, तर ते स्वत: हटवायला सुरुवात करु, असं ते म्हणाले होते. मी कोणत्याही धर्माच्या विरोधात नाही, पण कोणी कायदा मोडला तर ते मान्य नाही, असंही ते म्हणाले होते.


भोंग्यांबाबत भूमिका बदलण्याचा प्रश्न नाही : बाळा नांदगांवकर
"भोंग्यांसंदर्भात आज उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. मनसेकडून आम्ही तीन पदाधिकारी जात आहोत. राज ठाकरे यांनी 3 तारखेपर्यंतचं अल्टिमेटम दिलं आहे. त्यामुळे ही भूमिका बदलण्याचा प्रश्न नाही," असं बाळा नांदगावकर यांनी स्पष्ट केलं. तसंच या बैठकीला राज ठाकरे यांच्या गैरहजेरीचं कारणही त्यांनी सांगितलं. ते म्हणाले की, "राज ठाकरे यांच्या आधीच काही मुलाखती, अपॉईंटमेंट आहेत. त्यामुळे राज ठाकरेंनी बैठकीची जबाबदारी आमच्यावर सोपवली आहे."


'कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचं काम राज्य सरकारच करतंय'
बाळा नांदगांवकर यांनी राज्य सरकारवर कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम करत असल्याचा आरोप केला. राज्यात दोन-चार दिवसांत घडणाऱ्या घटना बघितल्या तर कायदा-सुव्यवस्था बिघडवण्याचं काम राज्य सरकारच करत आहे. असं नांदगांवकर म्हणाले. तसंच संभाजीनगरची सभा उत्तमप्रकारे होईल याची आम्हाला खात्री आहे, असंही ते म्हणाले.