Aditya Thackeray On BMC: मुंबई महापालिकेने रस्त्याच्या कॉंक्रिटीकरणाच्या कंत्राटदारांना दिलेल्या कामात घोटाळा झाल्याचा आरोप करत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी पुन्हा एकदा मुंबई महापालिकेचे प्रशासक आणि आयुक्त इकबाल सिंह चहल (Iqbal Singh Chahal) यांना पत्र लिहून या रस्ते कंत्राटीसंदर्भात प्रश्न विचारले आहेत. शिवाय विचारलेल्या प्रश्नानंतर आदित्य ठाकरे यांनी या प्रश्नांची धादांत खोटी आणि भ्रष्टाचाराला पाठीशी घालणारी उत्तरे प्रतिसाद म्हणून पाठवू नका अशी विनंती सुद्धा पत्राद्वारे आयुक्तांना केली आहे
शिवाय कंत्राटदारांवर तातडीने कारवाई करून मोठ्या प्रमाणात दंड ठोठावला जावा अशी मागणी या पत्राद्वारे आदित्य ठाकरे यांनी केली आहे.
आदित्य ठाकरे यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना विचारलेले प्रश्न नेमके कोणते आहेत?
1. दक्षिण मुंबईतील रस्त्यांच्या कामातील घोटाळ्यासाठी निलंबित करण्यात आलेल्या कंत्राटदाराला अद्याप ब्लॅक लिस्ट करण्यात आले आहे का? केले असल्यास, ती माहिती सार्वजनिक केली पाहिजे आणि इतर सर्व राज्ये आणि शहरांनाही त्याबद्दल माहिती दिली पाहिजे.
2. वर नमूद केलेल्या कंत्राटदाराला त्याच्या गुन्ह्यासाठी देय असलेला दंड भरावा लागला आहे का?
3. कामातला हा हलगर्जीपणा, चूकीच्या प्रशासकीय पद्धती, भ्रष्टाचार आणि घोटाळा, ज्यामुळे कंत्राटदाराचे निलंबन करावे लागले, त्याबद्दल जबाबदार असलेले रस्ते विभागाचे अधिकारी आणि खुद्द महापालिका आयुक्त चौकशीला सामोरे जातील का?
4. दक्षिण मुंबईतील रस्त्याच्या कामांची सुरुवात व्हावी ह्यासाठी नव्या कंत्राटदाराची निवड कधी केली जाईल?
5. रस्ते मेगा घोटाळ्यातून दिल्या गेलेल्या कामांमधील सद्यस्थितीत किती कामे सुरु झाली आहेत? त्यांची आजची स्थिती काय आहे?
6. रस्त्यांच्या कामाची सद्यस्थिती आम्हाला तपासता यावी ह्यासाठी मुंबईकरांना आश्वासन दिलेले सीसीटीव्ही आणि सार्वजनिक डॅशबोर्ड मुंबई महानगरपालिकेने बसवले आहेत का?
मुंबईत साडेआठ हजार कोटींची कामं खोक्यांसाठी थांबलेत
मुंबई शहरात सर्व मिळून साडेआठ हजार कोटींची कामे पडून आहे आणि ही रस्त्यांची काम होऊ नयेत यासाठी ट्रॅफिक पोलिसांनी एनओसी देऊ नये यासाठी त्यांच्यावर खोके सरकारकडून दबाव आहे असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला आहे. आमचं सरकार आल्यानंतर या सर्वांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचंही ते म्हणाले.
आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील रस्त्यांच्या रखडलेल्या कामांवरून एकनाथ शिंदे आणि राज्य सरकारवर जोरदार टीका केली. ज्या शहरांमध्ये प्रशासक आहेत त्या शहरांमध्ये घोटाळे सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला.
ही बातमी वाचा: