मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात टोळधाडीचं संकट घोंगावत आहे. ही टोळधाड मुंबईत धडकणार असून मुंबईकरांनी सावधान राहावे, अशा आशयाचे मॅसेज आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. मात्र, मुंबईला टोळधाडीचा कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेच्या आपातकालीन विभागाने ही माहिती दिली आहे.


राज्यात विदर्भ आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये टोळधाडीने शिरकाव केला आहे. परिणामी लाखो हेक्टर शेतीला याचा फटका बसत आहे. दुसरीकडे ही टोळधाड मुंबईत धडकणार असल्याच्या अफवा सोशल मीडियातून पसरत आहे. आधीच देशात सर्वाधिक कोरोना रुग्णांची संख्या मुंबईत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. त्यात आता हे नवीन संकट काय आहे, म्हणून नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे. मात्र, मुंबईच्या नावानं व्हायरल होणाऱ्या व्हिडीओनंतर महापालिकेने स्पष्टीकरण दिलं आहे. हे व्हिडीओ आणि मॅसेज मुंबईचे नसल्याचं प्रशासनाने म्हटलं आहे. तसेच खोटे मेसेज फॉरव्हर्ड करणाऱ्यांविरोधात कारवाई करणार असल्याचं प्रशासनाने सांगितले आहे.


पाकिस्तानातून टोळधाड येणार; भारतातल्या 5 लाख एकरवरच्या उभ्या पिकांसाठी धोका!


टोळधाडी बद्दल थोडक्यात माहिती




  • सहसा जून जुलैमध्ये वाळवंटातून टोळधाड भारतात घुसते. यंदा मात्र महिना दिड महिना आधीच आक्रमण केलं आहे.

  • सध्या टोळ जिथे अंडी घालतात त्या ठिकाणी फवारणी केली जात असली तरी प्रादुर्भाव वाढला तर विमानातून किंवा ड्रोनने फवारणी करण्याचा पर्यायही वापरला जाऊ शकतो.

  • ऐन खरीपाच्या तोंडावर आधीच कोरोनाची चिंता त्यात या टोळधाडीला सामोरं जाण्याचं मोठं आव्हान राज्य आणि केंद्र सरकारसमोर आहे.

  • सध्या पश्चिम आफ्रिकेच्या काही भागात, केनिया, सोमालिया, इथिओपिया, सुदान, दक्षिण इराण आणि नैऋत्य पाकिस्तानात जास्त प्रादुर्भाव आहे

  • लोकस्ट (Locusts ) म्हणजेच टोळधाड काही भागात नाकतोडे अशीही ओळख.

  • सूर्यादयापासून ते सूर्यास्तापर्यंत टोळ आधाशीपणे पिकांवर तुटून पडतात.

  • भारताच्या इतिहासात मोठ्या नुकसान करणाऱ्या 10 टोळधाडींची नोंद आहे.

  • साधारण 35 हजार लोकं किंवा 20 उंट किंवा 6 हत्ती एका दिवसात खाऊ शकतील एवढं पीक ही टोळ धाड (अंदाजे 4 कोटी) फस्त करु शकते.

  • FAO म्हणजेच अन्न आणि शेती कृषी संघटना या टोळधाडीबाबत महत्वाची माहिती गोळा करत असते. तसंच सर्व देशांना सावध करत असते.

  • टोळधाडीबाबत सहा आठवडे आधीच संबंधित देशांना इशारा दिला जातो.


Locust Attack | टोळधाडीमुळे देशातील लाखो एकर शेती संकटात, टोळांचा विदर्भातील अनेक जिल्ह्यात प्रवेश