मुंबई :  लॉकडाऊन लावायचा की नाही हे नागरिकांनी ठरवावे. कारण त्यांनी जर नियमांचे पालन केले नाही तर कोरोना रुग्णांची संख्या वाढून निर्बंध आणखी कडक करावे लागतील असे वक्तव्य मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांनी केले. लॉकडाऊनबाबत दोन महत्त्वाचे निकष, आहेत. हॉस्पीटलमध्ये किती बेड भरले आणि किती शिल्लक आहेत. दुसरा म्हणजे ऑक्सीजनचा वापर. कारण ऑक्सीजनचा वापर जर वाढला, हॉस्पीटलमध्ये लोक मोठ्या प्रमाणात दाखल झाले तर लॉकडाऊनबाबत निर्णय होऊ शकतो असेही चहल म्हणाले. कोरोनाच्या आकड्यांवर लॉकडाऊन होऊ शकत नाही तर हॉस्पीटलच्या वापरावर निर्णय होणार असल्याचेही ते म्हणाले. ओमायक्रॉनला हलक्यात घेऊ नका, तो एक विषाणू आहे असेही चहल यावेळी म्हणाले.


सध्या मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे परत मुंबईत लॉकडाऊन होणार का? निर्बंध अधिक कठोर करणार का?  याबाबत मुंबई महापालिका आयुक्त डॉ. इक्बालसिंह चहल यांच्याशी एबीपी माझाने संवाद सधला. यावेळी त्यांनी सविस्तर माहिती दिली. सध्या मुंबईत 10 टक्क्यांपेक्षा कमी ऑक्सीजनचा वापर होत आहे. ओमायक्रॉन झाला असला तरी हॉस्पीटलमध्ये जाण्याचे प्रमाण कमी आहे. ज्यांना लसीकरणाचे दोन डोस झाले आहेत, त्यांना ओमायक्रॉनचा धोका कमी असल्याचे चहल यांनी सांगितले. लसीकरण हे खूप महत्त्वाचे आहे. ज्यांनी लस घेतली त्यांना ओमायक्रॉन झाला तरी घाबरण्याचे कारण नाही. त्यांना जास्त लक्षणे दिसूनही येत नसल्याचे त्यांनी सांगितले. कोरोनाच्या मुंबईतील सध्याच्या स्थितीबाबत राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे लक्ष ठेवून आहेत. ते दिवसातून दोन वेळा परिस्थितीचा आढावा घेतात. तसेच पर्यावरमंत्री आदित्य ठाकरे हे देखील वेळोवेळी बैठका घेऊन परिस्थितीची माहिती घेत असल्याचे चहल यांनी सांगितले.


दरम्यान, ज्यांनी लसीचे दोन डोस घेतले आहेत, अशा लोकांनांच सार्वजनिक वाहतूक करण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे लसीकरण झालेल्या लोकांनी देखील नियमांचे पालन करुनच प्रवास करावा असे चहल यांन सांगितले. सध्या जरी कोरोना रुग्णांची संख्या वाढत असली तरी मृत्यूचा दर हा खूपच कमी आहे, त्यामुळे भीती बाळगण्याचे कारण नसल्याचे चहल म्हणाले, मात्र नियमांचे पालन करण्याचे आवाहन त्यांनी केले. डॉक्टरांनाही कोरोनाची लागण होत आहे. त्यांनीही काळजी घ्यावी.  डॉक्टर हे आमचे आधारस्तंभ आहेत. त्यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा असल्याचे चहल यांनी यावेळी सांगितले. सध्या 85 टक्के रुग्ण हे ओमायक्रॉनचे आहेत. त्यांना सौम्य लक्षणे आहेत. ओमायक्रॉनमुळे डेल्टाचे प्रमाण कमी झाले असल्याचे चहल यांनी यावेळी सांगितले.


राजकीय नेत्यांच्या कार्यक्रमांना मोठी गर्दी होतेय, त्याचबरोबर नियमांचे पालन केले जात नाही, असा त्यांना प्रश्न विचारला असता, चहल यांनी सांगितले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले आहे. 50 टक्क्यांपर्यंत उपस्थितीचे बंधन घालण्यात आले आहे. त्याप्रमाणे सर्वांनीच नियमांचे पालन करावे असे चहल म्हणाले. आम्ही मुंबईत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्याचे आदेश दिल्याचे चहल यावेळी म्हणाले. प्रत्येकाने जर मास्कचा वापर केला तर पुढचा धोका टाळू शकतो असेही चहल यावेळी म्हणाले.



महत्त्वाच्या बातम्या: