मुंबई : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे गेल्यावर्षी नागरिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अशातच वर्षाच्या सुरुवातीला देखील असंच काहीसं चित्र आहे. पुढील  चार ते पाच  दिवस राज्यात अवकाळी पावसासोबतच गारपिटीची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.  7 ते 10 जानेवारीदरम्यान राज्यातील विविध भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय. तर, 9 जानेवारीला विदर्भातील काही ठिकाणी गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांवर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 


2021 वर्ष संपता संपता अवकाळी पाऊस आणि गारपिटीनं शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले. अशातच आता पुन्हा एकदा 2022  सालच्या सुरुवातीला देखील असंच काहीसं चित्र निर्माण होण्याची शक्यता आहे. एकामागोमाग एक पश्चिमी चक्रावात येत असल्याने राज्याला पुन्हा एकदा अवकाळीला सामोरे जावं लागणार आहे. राज्यात 7 जानेवारी ते 11 जानेवारी दरम्यान पावसाळी वातावरण बघायला मिळू शकते.  


 विदर्भासह उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर पूर्व विदर्भातील काही भागात गारपिटीचा इशारा देखील नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आला आहे.  तसेच पश्चिम विदर्भातील अमरावतीत देखील एक-दोन ठिकाणी गारपिटीचा अंदाज आहे. 


अवकाळी पावसामुळं बळीराज्याच्या चिंतेत भर पडली असून यापूर्वी झालेल्या अवकाळीनं रबी पिकांना मोठा फटका बसला होता. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजावर आस्मानी संकट कोसळणार आहे.


महत्त्वाच्या बातम्या :