नवी मुंबई : सध्या देशात कोरोनाचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कोरोनाबाधितांचा कोविड सेंटरमधील कालावधी तणावरहित जावा आणि त्यांना सकारात्मक जीवनाची अधिक ऊर्जा मिळावी याकरिता नवी मुंबई महानगर पालिकेने नाविन्यपुर्ण उपक्रम हाती घेतला आहे. सिडको एक्झिबिशन कोविड सेंटरमध्ये पुस्तक ग्रंथालयाचे उद्घाटन करण्यात आले. महानगर पालिका आणि लेट्स रीड फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. आयुक्त अभिजीत बांगर आणि  लेट्स रीड फाऊंडेशन वानखेडे यांच्या उपस्थित पुस्तकालय सुरु करण्यात आले. 


कोविड सेंटरमध्ये पीपीई किट परिधान करत पुस्तकालयाची प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. सर्व रूग्णांना वाचण्यास पुस्तके मिळावीत यासाठी सेंटरच्या सर्व भागात पुस्तकांची कपाटे ठेवण्यात आली आहेत. यामध्ये विविध विषयावरील वाचनीय पुस्तके आहेत. दिवसभर टीव्ही, मोबाईल बघून कंटाळलेल्या कोरोना रूग्णांना पुस्तकांचे अनोखे विश्व खुले करून देण्यात आलेले आहे.



कोविड पॉझिटिव्ह रूग्णांना विलगीकरणासाठी कोविड सेंटरमध्ये दाखल केलं जातं. तिथे त्यांच्यावर उपचार केले जातात. अशातच त्यावेळी या रुग्णांकडे बराच वेळ असतो. कुटुंबांपासून ते दूर एकटेच असतात. अशावेळी या फावल्या वेळात आजाराविषयी तोच तोच विचार करून रूग्णांचे मनोबल खचण्याची शक्यता असते. अशावेळी या रुग्णांना माहिती, मनोरंजनपर विविध विषयांवरील पुस्तके उपलब्ध करून दिल्यास तो त्या विचारांपासून काही प्रमाणात दूर जाऊन पुस्तकांच्या जगात रमू शकतो. याद्वारे त्याच्या मनामध्ये सकारात्मक विचार निर्माण होऊन त्याची उमेद वाढू शकते. याच विचारांतून 'लेट्स रीड फाऊंडेशन' या समर्पित भावनेने व्यापक वाचक चळवळ राबविणाऱ्या संस्थेच्या संकल्पनेतून नवी मुंबई महानगरपालिकेच्या सिडको एक्झिबिशन कोविड सेंटरमध्ये हा अतिशय वेगळ्या स्वरूपाचा उपक्रम राबविण्यात आलेला आहे.


याठिकाणी मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील उत्तम ग्रंथसंपदा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. हलकीफुलकी मनोरंजक पुस्तके तसेच प्रेरणा देणारी चरित्रे, सकारात्मक विचार देणारे ग्रंथ अशा विविध आशयाची व नामवंत लेखकांची पुस्तके ठेवण्यात आली आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :